शिक्षक भरतीला नवीन आरक्षणाचा अडसर

0

नाशिक । प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकार्‍यांनी तयार केलल्या रिक्त जागांचे रोस्टर नव्याने तयार करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्याआधारे सुधारित आराखडा तयार होईपर्यंत शिक्षक भरती होणार नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्हा परिषद, महापालिका शाळांसह खासगी शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रियेला आत या नवीन आरक्षणाचा अडसर निर्माण झाल्याचे चित्र आहे.

खासगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित किंवा विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीला राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यासोबत महापालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे शाळांमध्ये रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची ऑनलाईन भरती केली जाणार आहे. यादृष्टिने शिक्षण विभागाने जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा घेत संपूर्ण रोस्टर तयार केले. विशेष म्हणजे राज्यात नाशिक जिल्ह्याचे पहिलेच रोस्टर आकृतिबंधात असल्याचे शिक्षण आयुक्तांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात तीन हजार 300 प्राथमिक शाळा असून, साडेबारा हजार शिक्षक आहेत. रोस्टरनुसार एकूण 820 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. पेसा अंतर्गत येणार्‍या आदिवासी तालुक्यांमध्ये शिक्षक भरतीच्या नियमावलीत भिन्नता असल्यामुळे येथील जागा वगळता, बिगर आदिवासी क्षेत्रात सुमारे 420 जागा रिक्त असल्याचे दिसते. खुल्या प्रवर्गातील दोन हजारांवर शिक्षक अतिरिक्त असल्यामुळे सुधारित आकृतीबंधात फारसा फरक होणार नाही, असे चित्र आहे.

रोस्टर बदलावे लागणार
राज्य शासनाने नुकत्याच लागू केलेल्या शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास (इएसबीसी) व खुल्या प्रवर्गाला केंद्र सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण त्वरित लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपले रोस्टर बदलावे लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांचा त्यात समावेश करावा लागेल. सुधारित रोस्टर तयार करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

*