Type to search

नाशिक

‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा

Share

नाशिक । प्रतिनिधी
तांत्रिक अडचणींमुळे बंद करण्यात आलेले शिक्षक भरतीचे ‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. येत्या 20 जूनपासून उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध होणार असून शाळांमध्ये नवीन शिक्षकांच्या नियुक्त्या जुलैमध्ये करण्यात येणार आहेत.

‘पवित्र पोर्टल’द्वारे होणारी शिक्षक भरती कोणत्या ना कारणाने लांबणीवर पडली आहे. आता पुन्हा प्रक्रिया सुरू होण्याला मुहूर्त सापडला आहे. पोर्टलवर 1 लाख 24 हजार 648 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची एकूण 12 हजार रिक्त पदे त्यातून भरली जाणार आहेत.

पवित्र पोर्टलवर नवीन सॉफ्टवेअर अपलोड करण्यात आले आहे. त्यावर अनेकदा अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची तपासणी व दुरुस्ती करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून पोर्टलच बंद ठेवण्यात आले होते. आता तपासणी पूर्ण झाली असून ते पुन्हा कार्यरत होण्यास सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या बैठक क्रमांकानुसार उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदविता यावेत, यासाठी पोर्टलवर वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. 24 जूनपर्यंत प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत.

दरम्यान वैयक्तिक अथवा अन्य काही कारणाने वेळापत्रकानुसार शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविता न आलेल्या उमेदवारांसाठी 25 ते 30 जून या कालावधीत सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे. यानंतर मात्र प्राधान्यक्रम भरण्यासाठी व लॉक करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. उमेदवारांनी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचा अभ्यास करूनच शाळांचा प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!