Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शिक्षकभरती जुलै अखेर पूर्णत्वासाठी प्रयत्न; पवित्र पोर्टल अपग्रेड करणार

Share

नाशिक ।  प्रतिनिधी
शिक्षक होण्याच्या प्रतिक्षेतील उमेदवारांची मुलाखतीशिवाय होणारी भरती ही जूनमध्ये, तर मुलाखतीद्वारे राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेतील अडचणी दूर करून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे नियोजन केले जात आहे.

भरती प्रक्रियेतील उमेदवारांना माहिती अपलोड करताना आणि शाळांचे प्राधान्यक्रम देताना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोर्टल दोन दिवसांसाठी तात्पुरते बंद ठेवले. तांत्रिक दुरुस्तीबरोबरच सरकारी निर्णयामुळे भरती प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत झालेल्या बदलांप्रमाणे पोर्टल अपग्रेड करण्यात येणार आहे. त्यासाठी आठवडा लागेल. त्यानंतर पुढील आठवड्यात पोर्टल कार्यान्वित होणार आहे. उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा दिली जाणार आहे.

उमेदवारांनी शाळांचे पसंतीक्रम दिल्यानंतर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह 13 ते 14 शिक्षण संस्थांमधील सुमारे नऊ हजार जागांसाठी मुलाखतीशिवाय भरती होणार आहे. यामध्ये मुलाखतीशिवाय निवड होणार्‍या पात्र उमेदवारांची यादी जाहीर होऊन त्यांना निवडपत्र दिले जाईल. ही प्रक्रिया जूनच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याच दरम्यान मुलाखतीद्वारे होणारी भरती सुरू राहणार आहे.

मुलाखतीशिवाय असणार्‍या भरतीमध्ये निवड न झालेल्या आणि मुलाखतीद्वारे भरतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी लावण्यात येईल. यामध्ये एका उमेदवाराला दहा वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीसाठी जाता येणार आहे. त्यासाठी महिन्याचा कालावधी दिला जाईल. त्या एका महिन्यात संबंधित संस्थेतर्फे निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.

त्यानंतर उमेदवारांना निवडपत्र देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जवळपास तीन हजार जागांसाठी असेल. जुलै अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!