Type to search

आवर्जून वाचाच नाशिक सेल्फी

टॅटू शरीरासाठी धोकादायक

Share

नाशिक । दि.12 सुशांत किर्वे
शहराच्या तरुणाईमध्ये टॅटूची जास्त क्रेझ आहे. मात्र, टॅटूमुळे संसर्ग होण्याचे प्रमाण वेगाने वाढत असून मानवी शरीरासाठी धोकादायक ठरत आहे. लहापणी मूल हरवू नयेत म्हणून हातावर टॅटू गोंदला जातो. तसेच श्रद्धा व तरुणपणी प्रेमापोटी किंवा क्रेझ म्हणून टॅटू गोंदला जातो.

मात्र, तोच टॅटू कालांतराने नकोसा वाटतो. त्यासाठी चुना वापरुन, निरमा-चुन्याचे मिश्रण लावून व डॉक्टरांच्या सल्ल्याविना घरगुती उपचार करुन टॅटू नाहीसा करण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी जखम होते, खड्डा व व्रण निर्माण होतो. उन्हाच्या संपर्कात त्वचा आल्यास उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य बिघडते.

शहरात टॅटूची क्रेझ मोठी आहे. दररोज शेकडो लोक कायमस्वरुपी टॅटू काढतात, पण संसर्गामुळे 60 टक्के लोक तो मिटवतातही. टॅटू काढण्यासाठी येणार्‍यांना टॅटूच्या जागी सूज, खाज अशा तक्रारी होतात. त्याशिवाय विषाणू संसर्गाची प्रकरणेही समोर आली आहेत. कायमस्वरुपी टॅटूच्या शाईतील डार्मिक लेयर या रसायनाच्या नॅनो कणांत संसर्ग पसरतो. त्यामुळे सामान्य संसर्गाशिवाय अ‍ॅलर्जी, टीबी आणि कोड यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. संसर्गामुळे शरीरात इतर आजारांशी लढण्याची क्षमताही कमी होते.

टॅटू त्वचेच्या दुसर्‍या स्तरात (डार्मिक लेयर) कायमस्वरुपी राहतो. टॅटूच्या शाईत निकेल, क्रोमियम, मँगेजीन, कोबाल्ट, ब्लॅक कार्बन, टिटॅनियम डायऑक्साइड यासारखी रसायने असतात. शाईतील रसायने नॅनो कणाच्या रुपात शरीरात आत पसरतात. त्यामुळे संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणारे लिम्फ नॉड्स प्रभावित होतात.

रुग्णालयात दररोज किमान तीन लोक टॅटू मिटवण्यासाठी येत आहेत. रुग्णालयातील विचक स्विच लेजर मशीनने टॅटू कायमस्वरुपी मिटवण्याचे काम केले जात आहे. अनेकजण लाल व हिरवा टॅटू काढण्यासाठी लोक येतात, पण त्यातील 80 टक्के भागच निघतो. उर्वरित भाग त्वचेतच राहतो, असे लेसर व कॉस्मेटिक सर्जन डॉ. प्रमोद महाजन यांनी सांगितले.

सुई, शाईमुळे संसर्ग
टॅटू काढणार्‍याकडून जर एकाच सुईचा वापर अनेकांवर केेला जातो. असे झाल्यास एचआयव्हीबाधित व्यक्तींवर अशा सुईचा वापर इतर निरोगी व्यक्तींना केल्यास त्यांनाही एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो. अनेकवेळा टॅटू तयार काढणारे या बाबींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे असे रोग होण्याची शक्यता वाढते.

त्वचेवर टॅटू गोंदवणे शरीरास घातक असते. गावठी पद्धतीने टॅटू गोंदवून घेणे कमी खर्चिक तर प्रोफेशनल टॅटू गोंदवून घेणे महाग असते. मात्र, गावठी पद्धती शरीरास धोकादायक आहे. अनेकजण टॅटू फॅशन, पॅशन, श्रद्धा व प्रेमापोटी स्वत:चे नाव, देवीचे नाव किंवा आवडत्या व्यक्तीचे नाव शरीरावर काढून घेतात. मात्र, कालांतराने टॅटू नकोसा वाटतो. तसेच संरक्षण खात्यातील नोकरी तसेच पोलीस भरतीदरम्यान टॅटू असलेला उमेदवार बाद ठरतो. त्यामुळे अनेक युवक टॅटू मिटवण्यासाठी घरगुती प्रयत्न करतात. टॅटू गोंदवण्यार्‍यांमध्ये 60 टक्के जणांना त्याचा नंतर पश्चाताप होत असतो. टॅटू काढण्यापूर्वी व्यक्तीने शंभरवेळा विचार करावा. टॅटू काढण्याचा ठाम निर्णय असेलच तर केवळ लहान आकारात आणि प्रोफेशन टॅटू काढावा.
– डॉ. प्रमोद महाजन, लेसर व कॉस्मेटिक सर्जन

टिटॅनियम ऑक्साईड घातक
टॅटूसाठी वापरल्या जाणार्‍या लाल शाईतील टिटॅनियम ऑक्साइड सर्वात घातक रसायन असते. अनेकवेळा त्याचा प्रयोग स्क्रीन पेंट आणि सर्वसाधारण पेंटमध्ये केला जातो. त्याच्या वापराने शरीरात संसर्ग होतो.

मांसपेशींना धोका
तरुण आपल्या त्वचेवर मोठ्या आवडीने टॅटू काढतात, पण त्यानंतर होणार्‍या नुकसानाची माहिती नसते. काही डिझाइन असे असतात ज्यात नीडल डाय शरीरात खोलवर टोचली जाते. त्यामुळे मांसपेशींना मोठे नुकसान होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!