Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात रसायनयुक्त ताडीची विक्री

Share

नाशिक । खंडू जगताप
जिल्ह्यातील दिंडोरी परिसरात एका रसायन उत्पादक कंपनीवर मागील महिन्यात मुंबईच्या पोलीस पथकाने छापा टाकून हजारो लिटर ‘क्लोरोहाईड्रो’ रसायन जप्त केले.

या रसायनाचा वापर करून बनावट ताडी तयार करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील शिंधीची झाडे, निर्माण होणारी निरा व यानंतर ताडी यांचा मेळ बसत नसल्याने जिल्ह्यात रासायनापासून तयार केलेल्याचा ताडीची सर्रास विक्री होत असल्याचे समोर येत आहे.

ताडी हे मद्य निराच्या रसापासून तयार करण्यात येते. निरेमध्ये नवसागर टाकल्यानंतर त्याचे ताडीत रूपांतर होते. नाशिक जिल्ह्यात 35 दुकानांना ताडी विक्रीचे परवाने आहेत. परंतु या दुकानांना नियमित हजारो लिटर पुरवठा होईल एवढी झाडे अस्तित्वात नाहीत. तसेच शिंदीच्या एका झाडापासून दररोज साधारण अर्धा ते एक लिटरपेक्षा अधिक निरा उत्पन्न होत नाही. त्यामुळे बहुतांश विक्रेते प्रत्यक्षात ‘क्लोरोहाईड्रो’ या घातक रसायनांचा वापर करून कृत्रिम ताडी तयार करतात.

अशी कृत्रिम ताडी पिण्यामुळे पिणारांचे मृत्यू झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. महाराष्ट्रातील ताडी-विक्री व्यवसायात 90 टक्के परप्रांतीय व्यावसायिक गुंतलेले आहेत. साधारणत: दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट ताडी विक्री केली जात असल्याची दखल राज्याच्या विधीमंडळाला घ्यावी लागली होती व त्याच्या आधारे संपूर्ण राज्यातच ताडी विक्रीवर बंदी घालण्याची कार्यवाही राज्य सरकारला करावी लागली होती.

फुफ्फुसांना छिद्रे पाडणे व हाडे ढिसूळ करणारे क्लोरोहाईड्रेड नावाच्या रसायनाचा मुख्यत्वे वापर करून तयार करण्यात येणार्‍या ताडीमुळे जिल्ह्यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे बनावट ताडीची विक्री शासनाकडून अधिकृत परवाना घेतलेल्या ताडी विक्रेत्यांकडून केला जात असल्याचे त्यावेळी उघडकीस आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सेतुरामन चोक्कलिंगम यांनी या प्रकरणी शासनाकडे अहवाल पाठवून ताडी विक्री बंदीची शिफारस केली होती. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास पाच ते सात वर्षे ताडी विक्रीवर शासनाने बंदी घातली होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात राबविलेल्या मोहिमेत बनावट ताडी आढळून आल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. साधारणत: मालेगाव, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेवर व नाशिक शहरातही काही ठिकाणी बनावट ताडी विक्री केली जात असल्याने अशा अड्ड्यांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनीही बनावट ताडीच्या विक्रीला दुजोरा दिला असून, त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित निरीक्षकांना देण्यात आल्या असल्याचे राजपूत यांनी स्पष्ट केले.

झाडांच्या संख्येवर परवाने
आता शासनाने ताडी विक्रीबाबत नवीन धोरण तयार करून झाडांच्या संख्येवर ताडी दुकानांचा लिलाव सुरू केला,जेणे करून झाडापासून निर्मित ताडीचीच विक्री केली जाईल परंतु या धंद्यातील माफियांनी त्यावरही तोडगा शोधून बनावट ताडी तयार करणे व तिची विक्री करून मानवी जीविताशी खेळण्याचा धंदा सुरूच ठेवला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!