स्वाईन फ्लू बळींची संख्या 16 वर

0

नाशिक । जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सोमवारी (दि.10) येवला येथील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. यामुळे चालू वर्षी जिल्ह्यातील स्वाईन फ्लू बळीचा आकडा 16 वर पोहचला आहे. जानेवारी ते 11 सप्टेंबर या कालावधीत 16 रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यातील 9 जण ग्रामीण भागातील, सहा रुग्ण शहरातील तर 1 रुग्ण नगर जिल्ह्यातील आहे.

अनिता चव्हाण (27, रा. येवला) असे या महिलेचे नाव असून त्यांना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, नाशिक महानगर पालिका हद्दीत सर्वाधिक 54 स्वाइन फ्लू ग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा कहर वाढत आहे. जिल्ह्यात ग्रामीणसह शहरातही स्वाइन फ्लूचा फैलाव होत असल्याचे चित्र आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत सर्वाधिक 54 स्वाइन फ्लू ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. तसेच देवळाली कॅन्टोंन्मेंट बोर्ड येथे 2 जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणमध्ये निफाड तालुक्यातील 9 रुग्णांपैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल चांदवड तालुक्यात 6 पैकी 2 रुग्णांचा, येवला तालुक्यात 2 रुग्णांचा, नाशिक तालुक्यातील 2 पैकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सिन्नर तालुक्यात सर्वाधिक 12 स्वाइन फ्लूग्रस्त रुग्ण आढळले. मात्र त्यांच्यावर वेळीच उपचार केल्याने ते सुखरुप वाचले. नाशिक जिल्हा रुग्णालयात 13 स्वाइन फ्लूग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर नाशिक महापालिकेच्या हद्दीतील खासगी रुग्रालयात 89 स्वाइन फ्लू ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

*