Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

फिरत्या रसवंत्यांनी वाढत्या उन्हात थंडावा

Share

नाशिक । प्रतिनिधी  उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, अंगाची लाहिलाही होत आहे. गर्मीपासून दिलासा मिळावा, यासाठी नागरिक थंडपेयांचा आधार घेत आहेत. फिरत्या ऊस रसगाड्यांवर रस पिण्यासाठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे त्यातील बहुतांश ऊस रस गाडेवाले हे मराठवाडा व विदर्भातील असून पोटापाण्यासाठी त्यांनी नाशिक गाठले आहे.

सूर्यदेव आग ओकत असून तापमानाच्या पार्‍याने चाळीशी पार केली आहे. शरीराला थंड ठेवण्यासाठी आईस्क्रिम, विविध फळांचे ज्यूस, कोकम, ताक, लस्सी आदींना शीतपेयांना मागणी वाढली आहे. ज्यूसमध्ये सर्वाधिक पसंती ही उसाच्या रसाला मिळत आहे. उसाचा रस हा शरीराला थंडावा देणारा व आरोग्यवर्धक असतो. सध्या उसाची गुर्‍हाळे व रसवंत्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

बीड, परभणी, अकोला, लातूर, उस्मानाबाद या दुष्काळी भागातून नाशिकमध्ये रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात लोक आले असून त्यांनी हातगाड्यांवरील रसवंत्या सुरू केल्या आहे. रस्त्याच्या कडेला हे हातगाडीवरील रसवाले सहज लक्ष वेधून घेतात. कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर या भागात उन्हाळ्याचे चार महिने हे लोक रसवंती चालविण्याचे काम करतात. पावसाळा सुरू झाला की, पुन्हा बिर्‍हाड गावाला हलवतात.

रसवंतीत यंत्राच्या साह्याने काढल्या जाणार्‍या रसाऐवजी हातगाडीवरील ऊसाच्या रसाची गोडी अधिक असते. त्यामुळे नागरिक हातगाड्यांवरील रस पिण्यास पसंती देत आहेत. शिवाय रसवंतीत एक ग्लाससाठी पंधरा रुपये मोजावे लागतात; तर हातगाड्यावर एका ग्लाससाठी दहा रुपये द्यावे लागतात. त्यामुळे हातगाड्यांवरील रस पिण्याकडे नागरिकांचा कल पहायला मिळतो.

प्रतिक्रिया
उस्मानाबादमध्ये गंभीर दुष्काळ आहे. रोजगार नसल्याने पोटापाण्यासाठी इतर शहरांमध्ये जाण्यासाठी पर्याय नाही.
– रामनाथ गुळवे, रसवंतीवाले

लातूर जिल्ह्यात दोन एकर जमीन आहे. गेल्यावर्षी कापूस लावला. परतु पाणी नसल्याने पीक गेले. रोजगारासाठी नाशिकमध्ये आलो आहे. येथे रसवंतीतून दररोज 700 ते 800 रुपये मिळतात.
– जीवा मालचे, रसवंतीवाले

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!