Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उन्हाळा स्पेशल : डोंगरची काळी मैना ‘करवंद’ नाशिकच्या गल्लोगल्ली

Share

नाशिक । गोकुळ पवार :

सध्या उन्हाचे चटके जास्त जाणवू लागले असून याच काळात निसर्गाचा अमूल्य ठेवा असणाऱ्या पर्वतरांगातून करवंदीच्या जाळी परीपक्व होऊ लागल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी या डोंगराच्या काळ्या मैनेचे आगमन झाले आहे. याचबरोबर जांभूळ, आंबा, रान आवळाही बाजारात दाखल झाला असून ग्राहकांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा देण्यास रानमेवा पूरक ठरत आहेत.

नाशिक जिल्हा मुळातच रानमेव्यांनी भरलेला दिसून येतो. जव्हार, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणच्या डोंगराला भागातील रानमेवा आपणाला शहरात दाखल झालेला दिसून येतो. काही वर्षांपासून जरी यामध्ये सातत्यपणा दिसून येत नसला तरी आदिवासींनी हि परंपरा कायम राखली आहे. आदिवासी समाजात अन्नाचा घटक म्हणून मान्यता असलेल्या रानमेव्याचे महत्त्व कमी झालेले नाही. हाच रानमेवा आदिवासी भागातील नागरिकांचे दानापाण्याची सोय करतांना दिसत आहे.

उन्हाळ्यात मध, करवंदे, गावठी आंबे, आवळा, रान फणस, ताडगोळे, भोकर, जांभळे गोळा करतात आणि बाजारात येऊन विकतात. वर्षांतून एकदाच आस्वाद घ्यायला मिळणारी ही फळे नाशिकच्या बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा रानमेव्याकडे चांगलाच कल दिसून येत आहे. सफरचंद, संत्री अशा फळावर सुखावणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसत आहेत. खेडयापाडयातून आलेल्या महिला टोपल्यातून ही फळे विकायला बसलेल्या बाजारात दिसत आहेत.

सध्या राज्यात दुष्काळाचे वातावरण असताना ऐन उन्हात आदिवासी मंडळी डोंगराळ भागात जाऊन करवंदाची जमवाजमव करीत असतात. पुढे याच करवंदाच्या विक्रीतून दोन वेळच्या जेवणाची सोय होत आहे. या भागातील अदिवासी बांधव करवंदे व इतर रानमेवा विक्रीसाठी शहरात आणत आहेत. सध्या शहरातील दुधबाजार, दहीपूल, मेनरोड, पंचवटी, काळा राम मंदिर यांच्यसह नवीन नाशिक सातपूर परिसरात करवंदांसह इतर रानमेव्याची विक्री होत आहे.

दरम्यान या रानमेवा नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगला असल्याचे मानला जाते. वेगवेगळया रोगांवर ती गुणकारी मानली जातात. बाजारात दिसणाऱ्या इतर फळांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रिया करण्यात येते, त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक असल्यामुळे रानमेव्याच्या रूपाने आरोग्यवर्धक पर्याय लोकांसाठी उपलब्ध आहे.

दहा रुपयाला एक वाटा
शहरात १० रुपये एक वाटा या दराने ही करवंदे, जांभूळ विकली जातात. एका टोपलीत साधारणपणे ५० ते ६० वाटे असतात. त्यानुसार दिवसभरात ४५० ते ५०० रुपये त्यांना मिळत असल्याचेही करवंद विक्रेत्या महिलांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!