Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

धरणांमध्ये उरला 5 टक्के जलसाठा; 15 धरणे कोरडीठाक

Share

नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 15 धरणे कोरडीठाक पडली असून उर्वरित धरणांमध्ये अवघा 5 टक्के जलसाठा उरला आहे. जूनचा पंधरवडा उलटला तरी जिल्ह्याला मान्सूनची प्रतीक्षा असून पाणीबाणीचे संकट गंभीर बनले आहे. काही धरणांनी मृत साठ्याची पातळी गाठली असून पुढील काळात जिल्ह्याची तहान भागवायची कशी, असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, शिल्लक पाण्याची चोरी अथवा अवैध उपसा होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत.

पावसाचे आगमन लांबल्याने दुष्काळाचा दाह सोसवेनासा झाला आहे. नदी, नाले, बंधारे कोरडे पडले असून बारमाही विहिरीही आटल्या आहेत. 398 टँकरद्वारे जिल्ह्याची तहान भागवली जात आहे. धरणांचा जिल्हा ही नाशिकची ओळख. मात्र धरणेही कोरडी पडत आहेत. 15 धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे, तर 7 छोट्या व मध्यम स्वरुपाच्या धरणांमध्ये 10 टक्क्यांहून कमी पाणी उरले आहे. गतवर्षी कमी झालेले पर्जन्यमान व परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नव्हती.

शेती व पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनामुळे धरणातील उपलब्ध जलसाठा झपाट्याने घटला. परिणामी धरणात आता 5 टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी हे प्रमाण 13 टक्के इतके होते. दरम्यान, ऐरवी 7 जूनपर्यंत जिल्ह्यात मान्सूनचे आगमन व्हायचे. यंदा मात्र अर्धा जून महिना संपला तरी पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पाऊस पडण्यास जुलै महिना उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे 5 टक्के जलसाठ्यावर पुढील पंधरा दिवस तहान भागवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

गंगापूर धरणात 17 टक्के पाणी
नाशिक शहराची तहान भागवणार्‍या गंगापूर धरणात 17 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या 31 जुलैपर्यंत शहराची तहान भागवली जाऊ शकते एवढा हा साठा आहे. मात्र पावसाचे आगमन लांबल्याने नियोजनाच्या दृष्टीने महापालिका पाणी कपातीवर विचार करत आहे. जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी मागेच पाणी कपातीच्या प्रस्तावावर महापालिकेने विचार करावा, असे आदेश दिले होते.

10 टक्क्यांपेक्षा जादा साठा
धरण             टक्के
गंगापूर           17
पालखेड         21

10 टक्क्यांपेक्षा कमी साठा
धरण                             टक्के
कश्यपी                           5
गौतमी गोदावरी                3
ओझरखेड                      3
दारणा                           7
मुकणे                           1
गिरणा                          8
पुनद                            1

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!