Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : मराठी मातीची शान ‘मल्लखांब’

Share

नाशिक : मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ म्हणजे मल्लखांब. महाराष्ट्रीय आखाड्यांना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत वे.मू. बाळंभटदादा देवधर यांनी मल्लखांब या खेळाच्या संशोधनाला नवचैतन्य दिले. आखाडा संस्कृतीला खऱ्या अर्थाने त्यांनी पुनर्जीवित केले. त्यांच्याबरोबरीने वैद्य म.द. करमरकरांनी महाराष्ट्रीय आखाडा संस्कृतीत महिलांच्या विकासाला चालना दिली. नाशिकमधील सर्वांत जुन्या यशवंत व्यायाम शाळेत पाचशे विद्यार्थी मलाखांबाचे शिक्षण घेत आहेत. गेल्या बत्तीस वर्षांपासून येथे मल्लखांब शिकवला जात आहे .व्यायाम शाळेत प्रशिक्षण घेण्याऐवजी अनेक विद्यार्थी खाजगी शिकवण्या लावतात. ज्यातुन खेळाचे मूळच हरवत चालले आहे .ऑल इंडिया गोल्डमेडलिस्ट उत्तरा खानापूरे हिने देखील या व्यायाम शाळेतच मल्लखांबाचे शिक्षण घेतले आहे.

मल्लखांबाचा सुरवातीला कुस्तीला पूरक व्यायाम म्हणून उपयोग होत असे.’मल्लखांब’ अर्थात एक मानवाकृती खांब ज्याच्या साहाय्याने मल्ल हे आखाड्यात तालीम करीत असत. त्या क्रियेतूनच ‘मल्लखांब’ हे नाव अस्तित्वात आले .आज भारतासह जगातील बावीस देशांमध्ये मल्लखांब खेळ खेळला जातो .

मल्लखांब हा एक स्वयंपूर्ण, स्वतंत्र व्यायामप्रकार म्हणून केवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांमध्येही प्रचलित आहे.
सुमारे आठ फूट उंचीचा, सरळसोट, गुळगुळीत, वर निमुळता होत जाणारा मल्लखांब हा मूळ प्रकार. त्याला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत सुमारे दोन फूट गाडलेला असतो. त्याच्या जमिनीवरील भागाचा आकारही मनुष्यदेहाप्रमाणे वर गोल डोके, मग अरुंद मान व खाली भक्कम शरीर असा असतो. शिसवीच्या लाकडाचा मल्लखांब सर्वांत उत्तम समजतात. तो थंड असतो. त्याचे तंतू जवळ असल्याने तो गुळगुळीत होऊ शकतो आणि त्यावरून शरीर घसरले तरी कातडे सोलवटत नाही. सागवानी लाकडाच्या मल्लखांबावर तो धोका संभवतो.

मल्लखांब पुरताना त्याच्या खळग्यात विटा, चुना, वाळू असे पदार्थ टाकतात. त्याच्या तळच्या अंगाला डांबराचा जाड लेप लावल्याने त्यास वाळवी लागत नाही. मल्लखांबाजवळची जमीन मऊ करतात, त्यामुळे कसरतपटू उडी मारून सहज उतरू शकतो.

मल्लखांबावर वेगवेगळ्या कसरती, अढ्या-तेढ्या, फिरक्या-गिरक्या, वेल-दसरंग, आसने, विळखे-फरारे, उड्या, झापा आदि प्रकार केले जातात. मल्लखांबाचे अशा हालचालींमुळे होणारे फायदे अमाप आहेत. तेल लावलेल्या खांबाभोवती संपूर्ण शरीराचे सतत घर्षण झाल्याने पूर्ण शरीराला उत्कृष्ट मालीश होते. उलट्या-सुलट्या वेगवान हालचालींमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था आदि शरीरांतर्गत व्यवस्था कार्यक्षम होतात. हातापायांच्या आढ्या-तेढ्या, विळखे-फरारे, झापा यांमुळे हातापायांचे पंजे, पोट-या, मांड्या, दंड, खांदे आदींच्या अंतर्गत संस्था अधिक कार्यक्षम होतात.

वेल, दसरंग, फिरक्या- गिरक्या, सर्पाकृती गतिमान हालचालींमुळे कंबरेचे व पोटाचे स्नायू, बरगड्या आणि आरोग्याची गुरुकिल्ली असलेला पाठीचा कणा यांना बळकटी येते. त्याशिवाय यकृत, प्लिहा आणि अंतरिंद्रियेही कार्यक्षम बनतात. मेद, सुटलेले पोट, वाढलेली चरबी कमी होते. केवळ शारीरिक नव्हे तर अनेक मानसिक कुवतींचाही विकास मल्लखांबामुळे होऊ शकतो.

स्थानिक पातळीवर मल्लखांब या खेळाबद्दल मात्र उदासीनता दिसून येते .आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मल्लखांब हा ब्रँड होऊ पाहतोय आणि दुसरीकडे मात्र मराठी माध्यमांच्या शाळेत त्यासाठी काही प्रयत्नच नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील आज मल्लखांब खेळा साठी प्रयत्न केले पाहिजे .कौतुकाची बाब म्हणजे’ मल्लखांब’ या खेळास वर्ल्ड चॅम्पियन या जगातील सर्वाच्च स्पर्धेत गणला जातो. आज देशासह राज्यात शासनाकडून अनेक पुरस्कार ही यासाठी दिले जातात .

मल्लखांबाचे तीन प्रकार आहेत .

पुरलेला मल्लखांब
मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार. मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन व शरीर उलटे करून पोट मल्लखांबांच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला ‘अढी घालणे’ असे म्हणतात. या अढ्यांतून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्नभिन्न प्रकार आहेत. अढ्यांचे एकंदर ९० च्या वर प्रकार आहेत. उदा., साधी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्याचा उपयोग कुस्तीत होतो. तसेच अश्वारोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नासयू बळकट होतात.

टांगता मल्लखांब
मल्लखांबाचा दुसरा प्रकार म्हणजे दोरीचा मल्लखांब. तो पूर्वी वेतावर केला जात असे, पण वेत मिळणे दुष्कर झाल्यावर त्या जागी दोरी वापरली जाऊ लागली. वरून टांगलेल्या वीस फूट लांब व अंगठ्याएवढ्या जाड सुती दोरीवर नयनरम्य व चित्तथरारक कसरती केल्या जातात. तो प्रकार प्रामुख्याने मुली करतात.

रिप मल्लखांब
तिसरा प्रकार टांगत्या मल्लखांबाचा. पुरलेल्या मल्लखांबाच्या अर्ध्या उंचीचा, तसाच दिसणारा लाकडी खांब वरून टांगलेला असतो. तो झुलता असल्याने स्वत:भोवती गोल फिरतो व लंबकाप्रमाणे आडवाही हलतो. त्यावर कसरत करणे आव्हानात्मक व जोखमीचे असते. मल्लखांब हा नव्वद सेकंदात पूर्ण केला जातो.

मल्लखांब हा भारतीय खेळ ज्याचा जन्म हा महाराष्ट्रात झाला .परंतु दुर्दैव असे की आज अनेकांना मल्लखांब या खेळाची प्राथमिक माहितीच नाही .मल्लखांब या खेळासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत .आज ऑनलाईन गेम्स आणि स्मार्टफोन मुळे मुलांचा शारीरिक तसेच मानसिक विकास खुंटतो. त्यासाठी पालकांनी गुरुची भूमिका बजावली पाहिजे त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी त्याच्या मनात ऊर्जा निर्माण केली पाहिजे.
-यशवंत जाधव, मल्लखांब प्रशिक्षक

(संकलन : जयश्री भामरे )

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!