Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एसटीच्या अधिकार्‍यांना वेतनवाढ; कामगार संघटना नाराज

Share

नाशिक । प्रतिनिधी
एसटीच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या अधिकार्‍यांना 2.67 टक्क्यांची वेतनवाढ जाहीर केली, मात्र वेतनवाढीच्या या निर्णयावर कामगार संघटना नाराज झाल्या आहे. अधिकार्‍यांप्रमाणे कर्मचारी, चालक आणि वाहकांनाही वेतनवाढ द्यावी, त्यात दुजाभाव करू नये, असे एसटी महामंडळाच्या संघटनांनी म्हटले आहे.

एसटीचे अधिकारी सक्षम आहेत. या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपली कामे प्रामाणिकपणे केली, तर एसटीची गती अधिक वाढेल, असे मत दिवाकर रावते यांनी एसटीच्या 71 व्या वर्धापनदिनी व्यक्त केले. तसेच एसटीच्या वर्ग 1 आणि 2 च्या अधिकार्‍यांना 2. 67 टक्क्यांची वेतनवाढ देण्याची घोषणाही केली. मात्र, रावते यांच्या या निर्णयाने एसटीच्या विविध संघटनांत नाराजी पसरली आहे.

याबाबत दाद मागणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. दरम्यान, निलंबन आणि बदली प्रक्रिया हद्दपार करण्यात आली असून, सहा महिन्यांत एसटीतील निलंबन आणि बदली प्रक्रिया बंद करण्यात येईल. त्यामुळे तडकाफडकी निलंबन, विशिष्ट कालावधीसाठी होणारे निलंबन बंद होईल. चालक, वाहक एखाद्या प्रकरणात दोषी असेल, तर 3 ते 6 महिन्यांपुरते निलंबन केले जाईल. 6 महिन्यांच्या आत आरोपांची चौकशी पूर्ण केली जाईल.

163 अधिकार्‍यांची खातेनिहाय बढती
अधिकार्‍यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करून त्यांना भरतीमध्ये 25 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. खातेनिहाय बढतीमध्ये 163 जणांची निवड झाली आहे. महामंडळामध्ये वर्ग 1 आणि 2 मध्ये 530 अधिकारी कार्यरत असून, त्यांना वेतन आयोगातील मूळ वेतनावर 2.67 टक्क्यांची वाढ मिळणार आहे.

एसटी अधिकार्‍यांना वेतन आयोगानुसार 2.67 टक्के वेतनवाढ दिली आणि कर्मचार्‍यांना 2.57. टक्के दिली आहे. हा दुजाभाव नको. कामगार, चालक व वाहक जास्त काम करतात. त्यांना अधिकार्‍यांप्रमाणे समान वेतनवाढ दिली पाहिजे. या अन्यायाविरोधात पुन्हा लढाई सुरू होईल.
-जयप्रकाश छाजेड, प्रदेशाध्यक्ष- इंटक संघटना

एसटी कामगारांचा करार झाला की, अधिकार्‍यांचा होतो. यंदा करारात अडचणी आहे. त्यामुळे आम्ही सह्या केलेल्या नाही. आम्हाला 2.57 टक्के ही वेतनवाढ मान्य नाही. आमची मान्यताप्राप्त संघटना आहे. संघटनेच्या मागण्यांचा मसुदा दिला आहे. त्यावर चर्चा होते. नंतर करार होतो. दिवाकर रावते यांना अति घाई झाली आहे, म्हणून त्यांनी मान्यताप्राप्त संघटनेला श्रेय द्यायचे नाही,यासाठी एकतर्फी करार घोषित केला, त्यात अनेक त्रुटी आहेत.

प्रमोद भालेकर,
प्रादेशिक सचिव, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!