Type to search

Breaking News Featured नाशिक

यंदाही स्मार्ट सिटीत तळीच साचणार का?

Share

नाशिक : गोकुळ पवार
यंदाच्या पावसाला सुरवात झाली असून जूनच्या अखेरीस ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. शहरात देखील गेल्या दोन दिवसाच्या पाऊसामुळे शहरातील नागरिक सुखावला आहे. पंरतु यंदाही पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून तळी तयार झाल्याचे निदर्शनास आले.

महापालिकेने मागील वर्षी पाणी साचणारे स्पॉट शोधून त्यावर उपाययोजनेची तयारी केली होती. या आराखड्यात शहरातील ३७ ठिकाणे गृहीत धरण्यात आली होती. परंतु असे नियोजन करूनही त्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना मागील वर्षी घडल्या. परंतु यंदाही अशाच पद्धतीने महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात नदी-नाल्यांसह या स्पॉटवरही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे का ? हा प्रश्न पडतो. कारण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अतिपावसाची शक्यता अधिक असून हे पावसाचे पाणी जमिनीत जिरण्यासाठी आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नसल्याने पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

गेल्या तीन दिवसांपासून शहरात पावसाचे आगमन झाल्याने शहरात आनंददायी वातावरण आहे. परंतु थोडा पाऊस झाला तरी शहरातील दहीपूल, मेनरोड, सराफबाजार, कॉलेजरोड, सिडको आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्यात रूपांतर झाले होते. शहरात असणाऱ्या वॉटर ड्रेनेज आणि स्ट्रॉंग ड्रेनेज एकत्र असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असतो. परिणामी हे पाणी रस्त्यावर अधिक येत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. गेल्या दोन दिवसात पाऊसाचे चांगले आगमन झाले असले तरी या पावसात शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचून जैसे थे परिस्थिती दिसून आली.

दरम्यान मागील वर्षी ज्याप्रमाणे पूरपरिस्थिती काळात ज्या ठिकाणी पूर असेल अशा नागरिकांसाठी संबंधित विभागीय कार्यालयांमार्फत ‘एसएमएस’ची सुविधा देण्यात आली होती. पावसाळ्यात वादळी वारे, मुसळधार पावसामुळे वृक्ष तसेच फांद्या उन्मळून रस्त्यावर-घरांवर पडतात. यासाठी काय सुविधा असणार आहेत तसेच आरोग्य विभागामार्फत काय व्यवस्था करण्यात आली आहे, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शहरात मागील वर्षी पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शहरात पावसाचे पाणी साचल्यामुळे यंदाही अशीच परिस्थिती उद्भवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

का साचतंय पाणी ?
शहरातील पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी स्वतंत्र वॉटर ड्रेनेज असायला हवे. जेणेकरून वाहून नेणाऱ्या पाईपलाईन वरती ताण न येता पाणी सुरळीत वाहत जाईल. परंतु शहरात वॉटर ड्रेनेज आणि स्टोरेज ड्रेनेज एकत्र असल्याने वाहून नेणाऱ्या पाईपलाईन वरती ताण येऊन अधिकचे पाणी रस्त्यावर येते. परिणामी मॅनहोलवर ताण येऊन मॅनहोल निकामी झाल्याने रस्त्यावर पाणी साचते. परिणामी हेच पाणी घरांमध्ये शिरते.

यावर उपाययोजना काय?
शहरातील नागरिकांनी पावसाच्या पाण्याचे आपापल्या पद्धतीने टेरेस किंवा पार्किंग मध्ये खोलगट भागात गोळा करून जमिनीत मुरवले पाहिजे. रिचार्ज फिट म्हणजेच पर्क्युलेशन पॉंईट तयार करणे आवश्यक आहे.

महापालिकेने वेळीच यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. क्षमतेपेक्षा जास्त पाणी शहरात अनेक ठिकाणी साचत असल्याने ड्रेनेज व्यवस्था बदलणे आवश्यक आहे. शहरातील छोटे छोटे नाले वेळीच साफ करून ड्रेनेजचे विलगीकरण करावे. जेणेकरून प्रवाहावर ताण न येता पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल.
प्राजक्ता बस्ते, नमामि गोदा-सल्लागार

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!