Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सव्वातीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह वाहतूक व्यवस्था होणार हायटेक

Share

नाशिक । शहरातील वाहतुक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी शहर पोलीसांनी कंबर कसली असून स्मार्ट सिटी अंतर्गत मिळणार्‍या सीसीटिव्ही कॅमेर्‍याची मदत घेऊन अगामी काळात पोलीस नागरीकांमधील वाद टाळून थेट ई चलानचा वापर होणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगीतले.

निवडणूक बंदोबस्त, सण उत्सव यामुळे मागील सहा महिने पोलिस व्यस्त होते. मात्र, यापुढील तीन महिने शहरातील वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. कालबाह्य झालेले नियम बदलणे, नवीन बदल लागू करणे आदी निर्णय घेण्यासाठी शहरातील सर्व रस्त्यांचे 1990 पासूनचे सर्व नोटीफिकेशन तपासण्यात येत आहे. यासाठी एक पथक सातत्याने काम करीत आहे. वाहतुक पोलीस सकाळी 6 वाजता व ठरावीक भागात कारवाई करणार असल्याचे अधिच घोषीत करण्यात येणार आहे. यामुळे नागरीकांनी तयारीत येणे व नियम पाळणे अपेक्षीत आहे.

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे 800 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पैकी 175 कॅमेरे हे वाहनांवरील नंबर प्लेट रिडींग करणारे असणार आहेत. तर 150 कॅमेरे इतर भागातील सिग्नलवर बसविण्यात येणार असून वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. सीसीटिव्ही कंट्रोल रूममध्ये खास वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी 8 पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

सीसीटिव्हीत वाहतुक नियम मोडणार्‍या वाहनांचे क्रमांक घेऊन या सर्वांना थेट ई चलान घरपोच अथवा मोबाईलवर एसएमएस द्वारे पोहच होणार आहे. याच्या परिणामी वाहनचालकांवर कारवाई करण्याठी असलेले पोलीस कर्मचारी कमी करून त्यांचा इतरत्र वापर करण्यात येणार आहे. शहरात विनापरवाना धावणार्‍या रिक्षांवर कारवाई करून शहरातील रिक्षांची गर्दी कमी करण्यात येणार आहे. अगामी काळात शहरातील सार्वजनिक बस व्यवस्था भक्कम होणार असल्याने त्यावर अधिक भर देण्यात येईल.

रस्त्यांचे सर्वेक्षण करून वाहतुक व्यवस्था अधिक सुटसुटीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सिग्नल व्यवस्था गुगल मॅपिंगवर स्वयंचलीत करण्यात येणार असून गर्दीनुसार सिग्नलची वेळ कमी अधिक होणार आहे. तर मुख्य मार्गावरील वाहनांना एक रांगेतील सर्व सिग्नल हिरवे मिळतील अशी सिग्नलच्या वेळा वाहनचालकभिमुख करणार आहे. पुढील तीन महिन्यांत शहरात वाहतूक बदलाचे सकारत्मक चित्र निर्माण होईल, अशी अपेक्षा पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!