सिन्नर : केएसबी पम्पसच्या कामगारांना घसघशीत पगारवाढ; आजारपणात अतिरिक्त २ लाखांची मदत

२५ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कामगारांना अडीच तोळे सोने भेट

0

सिन्नर । वार्ताहर : माळेगाव एमआयडीसीतील केएसबी पंपस लिमिटेड या कारखान्यात अंतर्गत कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात पगारवाढीच्या करारावर यशस्वी चर्चा होऊन कर्मचाऱ्यांना अच्छे दिनची अनुभूती देण्यात आली. सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील सर्वात मोठी १३ हजार ६०१ रुपयांची घसघशीत पगारवाढ केएसबी ने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली असून २५ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या सेवकांना देय रकमेसह २५ ग्रॅम सोन्याची अतिरिक्त भेट देण्यात येणार आहे. या पगारवाढीमुळे कारखान्यातील २६७ कायम कामगाराचे वेतन ५० हजार रुपयांच्या घरात पोहोचणार आहे.

सन 2019 ते 21 या कालावधीसाठी ही पगारवाढ देण्यात आली असून याबाबतच्या करारावर कामगार संघटनेचे पदाधिकारी व व्यवस्थापनातील अधिकारी यांनी सह्या केल्यावर कामगारांसाठी सुखद धक्का असणारी घोषणा करण्यात आली. १३ हजार ६०१ रुपयांची वाढ असणारा पगारवाढीचा करार जाहीर करतानाच २५ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कामगारांना अडीच तोळे सोने भेट म्हणून देण्यात येणार आहे.

याशिवाय रोख रक्कम व सन्मानपत्र देखील देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोठ्या आजारास उपचारासाठी दोन लाखांची मदत कारखान्याकडून देण्यात येईल. मयत कामगाराच्या वारसांना तातडीची मदत म्हणून ८० हजार रुपये दिले जाणार असून वेलफेयर योजना देखील अमलात आणली जाणार आहे. पाच लाख रुपयांपर्यंतची मेडिक्लेम पॉलिसी, प्रतीवर्ष ३० कामगारांना प्रत्येकी १ लाखांचे होमलोन, १३ कामगारांच्या पाल्यांसाठी १ लाखांचे शिक्षण कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कामगाराच्या आउट स्टेशन भत्त्यात वाढ करण्यात आली असून कॅंटीनमध्ये जेवणासोबत सफरचंद दिले जाणार आहे.

गणवेशात आता एक टी शर्ट मिळणार असून स्वेटर ऐवजी हिवाळा व पावसाळ्यात वापरता येतील असे जर्किंग देण्यात येणार आहे. याशिवाय कामगारांच्या मुलांना खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना देखील राबवण्यात येणार असल्याचे नवीन पगारवाढीच्या करारात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष किरण भाटजिरे यांनी पगारवाढीच्या कराराची घोषणा केली. व्यवस्थापनाच्या वतीने कार्मिक संचालक शिरीष कुलकर्णी, किरण शुक्ला, सिन्नर प्लांट हेड अभिमन्यू भिलारे, कर्मचारी संघटनेचे संपत झनकर, सुहास गोजरे, किरण गवळी, आण्णासाहेब शेवकर, समाधान शेळके, प्रशांत कोकाटे यावेळी उपस्थित होते. पगारवाढीचा गुडन्यूज कानी पडताच कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हा करार यशस्वी करण्याकरिता धर्मराज्य पक्षाचे संस्थापक व मुंबईतील कामगार संघटनांचे मार्गदर्शक राजन राजे, रमाकात नेवरेकर, पुणे येथील अनिल गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*