Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर – शिर्डी महामार्ग चौपदरीकरणासाठी १२० हेक्टरवर वरवंटा

Share

नाशिक । प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिन्नर – शिर्डी महामार्ग चौपदरीकरणासाठी सिन्नर तालुक्यातील 120 हेक्टरवरील जमिनीवर वरंवटा फिरवला जाणार आहे. भूसंपादन प्रक्रियेला सोमवारी (दि.24) प्रारंभ झाला. जमिनी देण्यास ग्रामस्थ राजी असले तरी जमिनीसाठी ‘समृध्दी’चा मोबदला दयावा, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, भूसंपादनासाठीे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 200 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहे.

नागपूर – मुंबई ही महाराष्ट्राची दोन टोके जोडणारा बहुचर्चित ‘समृध्दी’ महामार्ग सिन्नर तालुक्यातून जात असून भूसंपादनावरुन प्रशासन विरुध्द शेतकरी असा मोठा संघर्ष झाला होता. आता सिन्नर – शिर्डी महामार्गासाठी पुन्हा एकदा जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. एकूण 30 किलोमीटरचा हा महामार्ग असून सिन्नर तालुक्यातील 19 गावातील जमिनी बाधित होत आहे. गुरेवाडी ते पाथरे असा हा महामार्ग असणार आहे.

सिन्नर – शिर्डी महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता या महामागार्च चौपदरीकरण व्हावे, ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ऑक्टोबर 2017 मध्ये चौपदरीकरणासाठी अधिसूचना प्रसिध्द झाली. प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रियेस सोमवारपासून सुरुवात झाली. 19 पैकी 7 गावातील भूसंपादनासाठी निधी प्राप्त झाला आहे. बांधित शेतकर्‍यांनी संमतीपत्र देण्यासाठी भूसंपादन कार्यालयात गर्दी केली होती. बाधित जमिनी या जिरायती क्षेत्रात मोडतात.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जमिनीला जादा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे बाधित शेतकरी नाराज आहे. निदान ‘समृध्दी’ इतका तरी मोबदला दयावा, अशी मागणी त्यांनी भूसंपादन अधिकार्‍याकडे केली आहे. मोबदल्याबाबत शेतकरी नाराज असल्यास त्यांना लवादाकडे अपील करण्याचा पर्याय आहे.

या गावातून जाणार महामार्ग
गुरेवाडी, कुंदेवाडी मजरे, मुसळगाव, केदारपूर, शहापूर, खोपडी बुद्रूक, खोपडी खुर्द, फर्दापूर, भोकणी, धारणगाव, पांगरी बुद्रूक, पांगरी खुर्द, वावी, फुलेनगर, दुसंगवाडी, पिंपरवाडी, मिरगाव, वारेगाव, पाथरे खुर्द

पालखीसाठी स्वतंत्र मार्ग
मुंबई व गुजरातचे भाविक मोठ्या संख्येने साईपालख्या या महामार्गावरुन जातात. या ठिकाणी अनेकदा अपघात घडून अनेक भक्तांना प्राण गमवावे लागले आहेत. ते बघता नवीन महामार्ग बांधताना साई पालख्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

सिन्नर – शिर्डी महामार्ग (एन.एच.160) भूसंपादनाला सोमवारपासून सुरुवात झाली. त्यासाठी 200 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या संमतीनंतरच जमिनी घेतल्या जात आहे.
-स्वाती थवील, उपजिल्हाधिकारी भूसंपादन

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!