Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : पारंपरिक विधीला छेद देत अग्निसंस्कार; वीरशैव लिंगायत समाजाचा क्रांतिकारक निर्णय

Share

सिन्नर । वीरशैव लिंगायत समाजात मृत्यूनंतर पार्थिव जमिनीत खोलवर खड्डा खोदून दफन केले जाते. त्यानंतर त्या जागेवर स्मारक उभारले जाते. मात्र सिन्नरमध्ये समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नाही. त्यामुळे समाजातील एका कुटुंबाने पारंपरिक विधीला फाटा देत अग्निसंस्कार केले. सिन्नरमधील लिंगायत समाजातील ही पहिलीच घटना घडली.

वीरशैव लिंगायत समाजात धार्मिक तसेच अंत्यविधी धर्मगुरू अथवा जंगम स्वामी यांच्या अधिपत्याखाली केले जातात. अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची आवश्यकता असते. शासनाकडे लिंगायत समाजाने स्मशानभूमीसाठी मागणी केली आहे. मात्र मागणी केलेल्या बहुतेक जागांवर पक्की घरे बांधून अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे अडचणी येतात. त्यामुळे वेगळा निर्णय घ्यावा लागतो.

येथील देशमुख मळ्यात लिंगायत समाजाचे अविनाश आष्टुरे यांची मुलगी तृप्ती शिशिर ताकटे हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. सिन्नर येथे लिंगायत समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नाही. संगमनेर नाक्याजवळ पूर्वी स्मशानभूमी होती, त्यावेळी समाजाची एक-दोनच घरे असल्याने अडचण येत नव्हती. परंतु आता नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरून येणार्‍यांची संख्या वाढली असून आता दहा-बारा लिंगायत समाजाची घरे आहेत. त्यामुळे स्मशानभूमीची जागा अपुरी पडते.

विशेष म्हणजे याच जागेत दशनाम गोसावी समाजाची स्मशानभूमी आहे. त्यांच्यातही दफनविधी केला जातो. त्यांची घरे अधिक असल्यामुळे त्यांचेच वर्चस्व असते. त्यामुळे दफनविधी करताना लिंगायत व गोसावी समाजात वाद निर्माण होतात. हा वाद निर्माण होऊ नये म्हणून वीरशैव युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके, उपाध्यक्ष डॉ. विजय लोहारकर व पदाधिकार्‍यांनी आष्टुरे, ताकटे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून पारंपरिक अंत्यविधी न करता अग्निडाग देण्याचा निर्णय घेतला. पार्थिवावर रात्री उशिरा अग्निसंस्कार करण्यात आले. सिन्नरमधील लिंगायत समाजातील ही पहिलीच घटना आहे.

घराच्या प्रांगणात अस्थी विसर्जन
दुसरा क्रांतिकारक निर्णय म्हणजे मुलीचे अस्थी विसर्जन स्मशानभूमी तसेच गंगेत न करता घराच्या प्रांगणातच खड्डा खोदून अस्थी विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण केले. मुलीच्या चिरंतन स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करून त्या जागेवर स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे शहर परिसरातून सर्वांनी स्वागत केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!