अकोले तालुक्यातील निळवंडे येथील काम लवकरच सुरु करू : मुख्यअभियंता कुलकर्णी

0

कोपरगाव प्रतिनिधी : अकोल्याचे आ. वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील कालव्यांचे बेकायदा बंद केलेले काम पुन्हा पूर्ववत सुरु करा व काम बंद करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा या दोन प्रमुख मागण्यासाठी काल नाशिक येथील जलसंपदाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून येत्या महिनाभरात या प्रकल्पाच्या सर्व अडचणी दूर करून काम पूर्ववत सुरु करू दोषी विरुद्ध कारवाई करू असे आश्वासन जलसंपदाचे मुख्यअभियंता कि.बा.कुलकर्णी यांनी दिल्याने आंदोलन सायंकाळी पाच वाजता मागे घेण्यात आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, निळवंडे कालवा कृती समितीने मोठा पाठपुरावा करून या प्रकल्पाच्या कालव्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी केंद्रीय जल आयोगाने सतरा मान्यता मिळवून निधी मिळविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. खंडपीठाने या प्रकल्पाला निधी देण्याचे आदेश २६ ऑक्टोबरला दिलेले आहे. आज निधी शिल्लक असतांना अकोले तालुक्यात काम चालू करण्यास जलसंपदा विभाग उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावातून चालढकल करीत असून त्यामुळे प्रस्तावित लाभक्षेत्रातील नगर-नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांत मोठा असंतोष धुमसत आहे.

राज्याच्या जलसंपदा विभागाकडे आज जवळपास अडीचशे -तीनशे कोटींचा निधी शिल्लक आहे. या निधीतून केवळ अकोले तालुक्यातील शुन्य ते २८ कि.मी.तील खडकाळ भागातील कामे तातडीने करावे अशी मागणी कालवा कृती समितीने जलसंपदा विभागाकडे वारंवार केली आहे. मात्र अकोले तालुक्यातील आ. वैभव पिचड मात्र भूसंपादनाचा मोबदला पस्तीस वर्षांपूर्वी मिळाला असतानाही काहीं असंबद्ध लोकांना हाताशी धरून अतार्किक मागण्या करून आगामी निवडणुकीचे राजकारण करून दुष्काळी १८२ गावांना वेठीस धरत आहे. त्या विरोधात निळवंडे कालवा कृती समितीने आंदोलन छेडले आहे.

३० नोव्हेंबर रोजी नगर येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी ४ डिसेंबरला तर १७ डिसेंबरला संगमनेर येथील जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना कोंडून घेतले. त्यावेळी २० डिसेंबरला काम चालू करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना अकोलेचे आ. वैभव पिचड यांनी बनावट शेतकऱ्यांना हाताशी धरून काम बंद केले. त्या विरुद्ध पोलीस व जलसंपदाने बघ्याची भूमिका घेतली तर या कृत्याचा निषेध करणाऱ्या जवळके येथील दुष्काळी शेतकऱ्यांवर मात्र शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्यामुळे शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात असंतोष धुमसत आहे. म्हणून काल नाशिक येथील जलसंपदाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्यअभियंता यांचे कार्यालयासमोर कालवा कृती समितीने सकाळी अकरा वाजेपासून धरणे आंदोलन सुरू केले होते.

सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, नानासाहेब गाढवे, विठ्ठलराव पोकळे, कार्याध्यक्ष मच्छिन्द्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर राहणे, रमेश दिघे, नामदेवराव दिघे, सोमनाथ दरंदले, बाबासाहेब गव्हाणे, उत्तमराव जोंधळे, साईनाथ राहणे, तानाजी शिंदे, अशोकराव गांडूळे, दत्तात्रय आहेर, विठ्ठल गांडूळे, संतोष तारगे, ज्ञानेश्वर गव्हाणे, कैलास राहणे, बाळासाहेब नाईक, नवनाथ थोरात, सोपान थोरात, बाळासाहेब नाईक, साहेबराव मुर्तडक, गोरक्षनाथ शिंदे, चंद्रकांत नाईक, चंद्रकांत थोरात, मच्छीन्द्र चांगले, अनिल भडांगे, विठ्ठल रणमळे, ज्ञानेश्वर रणमळे, दीपक भडांगे, शरद मुर्तडक, सुभाष वराडे, अशोक भडांगे, राहणे बी.सी., नवनाथ थोरात, सुधाकर शिंदे, ज्ञानदेव शिंदे, अण्णा पोलादे, अनिल जवरे, गोपीनाथ तेलंग, शिवाजी जाधव, भाऊसाहेब घुले, एकनाथ आहेर, मोतीराम भडांगेआदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी साडेचारच्या सुमारास मुख्यअभियंता कि.बा. कुलकर्णी हे आंदोलनस्थळी आले व त्यांनी कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी आपल्या कार्यालयात चर्चा केली व एक महिन्याच्या आत बंद केलेले काम सर्व अडचणी दूर करून पूर्ववत सुरु करू, प्रकल्पाचा निधी परत जाऊ देणार नाही, जवळके येथील आ. पिचड यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिल्याने काळ सायंकाळी पाच वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आ. वैभव पिचड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या ,कालव्यांचे काम पूर्ण करण्याबाबत दिवसभर जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

LEAVE A REPLY

*