पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली कार चाकणमध्ये हस्तगत

जेल तोडून पळालेल्या सूत्रधारासह तिघांना पकडले ; नाशिकमधून भाडोत्री घेतली होती कार

0

सिन्नर । वार्ताहर
शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जायचे सांगून नाशिक येथून भाडोत्री कार ठरवणाऱ्या त्रिकुटाने गेल्या महिन्यात पाथरे शिवारात चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली स्विफ्ट डिझायर कार गेल्या आठवड्यात चाकण पोलिसांनी हस्तगत केली आहे. या कारच्या मदतीने गुन्हा करून पळणाऱ्या त्रिकुटाच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीचा म्होरक्या राजगुरूनगर येथील जेल तोडून पाळलेला अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर अनेक जिल्ह्यांमध्ये घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

दि. १७ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजता नाशिकच्या द्वारका तेथून तिघा तरुणांनी शिंगणापूरला जाण्यासाठी ओला या कंपनीची कार ऑनलाईन बुक केली होती. मात्र त्यांना पिकअप करण्यासाठी द्वारका परिसरात तात्काळ कार उपलब्ध न झाल्याने ओला कंपनीने अन्य कार सर्विसेस मार्फत एमएच १५ ईई ०९०२ या क्रमांकाची मारुती स्विफ्ट डिझायर कार सदर प्रवाशांना पिकअप करण्यासाठी पाठवण्यात आली होती. एजाज अफजल पटेल ( २८ ) रा. कॅनॉल रोड, जेलरोड ( नाशिकरोड ) हा चालक कारमध्ये या तिघा प्रवाशांना घेऊन शनिशिंगणापूरकडे निघाला असताना पाथरे गावाच्या लगत असणाऱ्या सायाळे रस्त्यावर या तिघांनी कार नेण्यास सांगितले. चालकाने विरोध केल्यावर एकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल सदृश्य हत्यार लावले. महामार्गापासून अर्धा किमी आत गेल्यावर चालक एजाज यांच्या जवळील मोबाईल फोन, खिशातील कागदपत्रे व १७०० रुपये रक्कम काढून घेऊन त्याला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नालीत ढकलून देण्यात आले. तेथून कार पुन्हा महामार्गाकडे नेत हे तिघे प्रवासी पसार झाले होते. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात कारचा चालक एजाज याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या शनिवारी (दि. १२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राजगुरूनगर परिसरात स्विफ्ट डिझायर कार आडवी लावून एका बोलेरो जीपमधील प्रवाशांना लुटण्यात आले होते. एमएच १४ डीएक्स ८७८५ या क्रमांकाच्या कारमधून आलेल्या पाच जणांनी बोलेरो जीपमधील प्रवाशांना उतरून देत ती लांबवली होती. हि घटना घडल्यावर चाकण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दोन्ही वाहने पकडण्यात आली. पोलिसांनी रस्ता अडवल्याचे पाहून पाचही चोरटे खाली उतरून पळू लागले. त्यातील तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विशाल दत्तात्रय तांदळे (२२) , गणेश भास्कर वाबळे (१८), आरिफ अस्लम नाईकवाडे (२१) सर्व रा. मंचर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.

विशाल तांदळे हा या टोळीचा सूत्रधार असून गेल्या ऑक्टोबर महिन्यात राजगुरूनगर पोलीस ठाण्याची कोठडी तोडून तो पळून गेला होता. पुणे, नाशिक, अमरावती, अहमदनगर, बीड जिल्ह्यांसह पुणे रेल्वे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात त्याच्याविरोधात जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरीचे तब्बल ३३ गुन्हे दाखल आहेत. अहमदनगरच्या कर्जत पोलिसांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तो हवा होता.

नंबरप्लेट बदलून कारचा वापर
नाशिक येथून पळवण्यात आलेल्या स्विफ्ट डिझायर कारची नंबरप्लेट बदलून तांदळे व त्याची गॅंग गुन्हेगारी कृत्ये करत होती. फोनवरून भाडोत्री वाहने ठरवायची, मित्रांच्या मदतीने चालकाला मारहाण करून निर्जनस्थळी सोडायचे व चोरी केलेल्या वाहनांचा लुटमारीसाठी वापर करायचा. या पद्धतीने त्याने अनेक वाहने लांबवली असून पाथरे येथे चालकाला धाक दाखवून कार लांबवल्याची त्याने कबुली दिली. चाकणमध्ये हीच कार बनावट नंबरप्लेट लावून वापरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

LEAVE A REPLY

*