Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : भोजापूरचे पूरपाणी फुलेनगर बंधाऱ्यात दाखल

Share
सिन्नर : सिन्नरच्या पूर्वभागातील फुलेनगर व दुशिंगपूर  येथील साठवण बंधारे करून घेण्यासाठी सोडण्यात आले भोजापूरचे पूर पाणी आज (दि.१२) पहाटे फुलेनगरच्या बंधाऱ्यात दाखल झाले. धरणातून आवर्तन सुटल्यानंतर तब्बल आठवडाभराने पाणी पूर्व भागात पोहोचल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या पाण्याचा लाभ औट घटकेचा ठरू नये अशी मागणी करत पूर्व भागातील दोन्ही बंधारे पाण्याने भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
नांदुरशिंगोटे दोडीसह पूर्व भागासाठी भोजापूर धरण वरदान ठरले आहे. सिन्नर-संगमनेर तालुक्यातील क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले आहे. पूर्वेकडील गावांसाठी धरणाच्या पूर पाण्याचा लाभ दिला जात असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पूर पाण्याचा पुरेसा लाभ मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे.
पूर्व भागातील फुलेनगर व दुशिंगपूर येथील साठवण तलाव मध्यम प्रकल्प म्हणून जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येतात. हे दोन्ही तलाव पूर पाण्याने भरून घेण्याचे नियोजन आहे. यासाठी संगमनेर तालुक्यातील निमोण शिवारातून दुशिंगपूरसाठी स्वतंत्र चारी काढण्यात आली आहे. या चारीवर गेल्या वीस वर्षात लाखो रुपयांचा खर्च होऊनही पूर पाण्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नेहमीच संतापाची भावना असते.
प्रत्येक वेळेला पाणी सोडले तरी वरच्या भागात वळवून घेतले जाते व दुशिंगपूरसह फुलेनगर, काहांडळवाडी, घोटेवाडी परिसरातील शेतकरी तहानलेलेच असतात. यंदा देखील भोजापुर धरण म्हाळुंगीच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाल्यानंतर पूर पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र, आठवडा उलटूनही हे पाणी निमोण गावाच्या पुढे सरकत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना होती. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान नियोजनामुळे पूर पाण्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप पूर्व भागातील शेतकरी करत आहेत.  पूर पाणी उशिराने का होईना आजदि.12  फुलेनगर बंधार्‍यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पाण्याने फुलेनगरसह  दुशिंगपूर येथील तलाव भरून घेतल्या पूर्वभागातील जलसंकटापासून किमान वर्षभरासाठी सुटका होणार आहे.
समृद्धीमुळे फायदा 
फुलेनगर येथील साठवण बंधाऱ्यातून समृद्धी महामार्गासाठी हजारो क्युबिक मीटर खोदकाम करून वर्षानुवर्षे साठलेली माती गौणखनिजाचा उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढली असून पूर पाण्याचा अपेक्षित लाभ मिळाला तर परीसरातील तीन गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
पूर्व भागाला पावसाची प्रतीक्षा भौगोलिक विषमतेमुळे सिन्नरचा पूर्ण भाग पाण्यापासून नेहमीच वंचित राहतो. या भागात यंदा देखील अपेक्षित पर्जन्यमान झाले नसल्याने विहिरींची खालावलेली पातळी जैसे थे आहे. पावसाळ्यानंतरचे दोन महिने सोडले तर पुन्हा एकदा या भागात माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तोंड वर काढू शकतो. अपेक्षित पाऊस न झाल्याने या भागातील सर्व ओढे,नाले, बंधारे कोरडेठाक असून अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
शेतकऱ्यांकडून उपोषणाचा इशारा 
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी भोजपुरच्या पुरपाण्याने सर्वप्रथम दुशिंगपूर व  फुलेनगरचे बंधारे भरून घेण्यात येतील असे लेखी आश्वासन गेल्या वर्षी दिले होते. यंदा धरण तब्बल दोन आठवडे अगोदर ओवरफ्लो होऊनही रब्बी आवर्तनाचा लाभ मिळणाऱ्या दोडी, नांदुरशिंगोटे भागात पूर पाणी खेळवले जात असल्याचा आरोप पूर्वेकडील शेतकऱ्यांचा आहे.
प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक पूर्व भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असून या विरोधात बुधवारी (दि.१४) थेट भोजापूर धरणावर उपोषणास बसण्याचा इशारा पूर्व भागातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे, कानिफनाथ घोटेकर, नितीन अत्रे, सुधाकर भगत, भास्कर कहांडळ आदींसह शेतकऱ्यांनी दिला आहे.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!