Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

श्रावणी सोमवार : कपालेश्वर मंदिरातून ‘पंचमुखी’ महादेव पालखी सोहळ्याला सुरुवात

Share

नाशिक । प्रतिनिधी : तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रथेनुसार दुपारी अडीच वाजता पंचमुखी कपालेश्वर मंदिरात आणण्यात येणार असून दुपारी चार वाजेच्या सुमारास कपालेश्वर मंदिरातून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर संध्याकाळी सात वाजता रामकुंडावर महापूजा बांधली जाणार आहे.

गेल्या १२६ वर्षापूर्वी कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९३ ला दि कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली. वंश परंपरेप्रमाणे वैद्य कुटुंबीयाकडे सदर पालखीचा मान आहे. अरविंद ठाकूरलाल वैद्य, जगदीश ईश्वरलाल वैद्य, सुहास अरविंद वैद्य आणि मनोज अरविंद वैद्य या पालखी सोहळ्याची परंपरा जोपासत आहेत.

सुरुवातीला सोमवारी सकाळी अरविंद वैद्य पंचमुखी महादेवाची पूजा करतील. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पंचमुखी कपालेश्वर मंदिरात आणण्यात येईल. त्यानंतर कपालेश्ववर मंदिरात विधीवत पूजा आणि श्रुंगार करून सवाद्य पालखी सोहळ्याला सुरुवात होईल.

सदरची पालखी कपालेश्वर मंदिरातून निघून मालवीय चौक, शनी चौक, राममंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, मुठे गल्ली पुन्हा शनी चौकातून रामकुंडावर साडे सहाच्या दरम्यान आणली जाते. यावेळी पालखी सोहळ्याच्या मार्गावर भक्ती गण मोठ्या उत्साहाने रांगोळी काढून पालखी स्वागत करणार आहेत . त्यानंतर पुढे रामकुंडावर दुध, दही, मध, उसाचा रस याचा अभिषेक करण्यात येतो. महाआरती झाल्यानंतर पंचमुखी कपालेश्ववर मंदिरात नेली जाते.

तिथे पुन्हा एकदा रात्री बारा वाजता महापूजा केली जाते. मंगळवारी सकाळी उत्तर पूजा केल्यानंतर मुखवटा वैद्य कुटुंबीयांकडून घरी नेण्यात येतो. पुढे विधीवत पूजा करून देव्हाऱ्यात मुखवट्याची स्थापना केली जाते. यावेळी रामकुंडावर परंपरेनुसार शरद दीक्षित गुरुजी पंचमुखीची पूजा, आभिषेक करतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!