Type to search

Breaking News नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

श्रावणी सोमवार : मनाला आनंद देणारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा

Share

श्रावण महिन्यातील ब्रह्मगिरीची फेरी आणि विशेषत: तिसर्‍या सोमवारची फेरी सर्वांचेच आकर्षण ठरली आहे. लाखो लोक ही फेरी मारू लागले आहेत. तथापि फेरीचा अर्थ काय? ती कधी आणि कशी मारावी? याविषयी..

महिना सुरू झाला की हमखास आठवण होते ती त्र्यंबकेश्वरची आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची. पहिल्यांदाच प्रदक्षिणेला गेलेला जेव्हा परतीच्या मार्गावर असतो तेव्हा तो यापुढे परत कधीही प्रदक्षिणेला येणार नाही असे वारंवार  स्वत:ला बजावतो, परंतु जेव्हा पुढच्या वर्षी श्रावणात आकाशात ढग दाटी करायला लागतात, सणांचा माहोल सुरू होतो, श्रावणी सोमवारची आणि शिवामुठीची चर्चा सुरू होते तेव्हा सगळ्यांच्याच मनात प्रदक्षिणेची ओढ लागते आणि सर्वांची पावले त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या रस्त्याला कधी लागतात हे त्यालाही कळत नाही.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ज्याला बोलीभाषेत फेरी म्हटले जाते ती आहेच तशी कसोटी पाहणारी, मनाला आनंद आणि सामील होणार्‍या प्रत्येकाला निसर्गाची अनुभूती देणारी.

साधारणत: महिना-दोन महिन्याचा पाऊस झालेला असतो. हिरव्या रंगाची मखमल अंगावर घेतलेला ब्रह्मगिरी. त्याच्या पर्वतराईतून खळाळणारे शुभ्रधवल धबधबे. धुक्याची चादर पांघरलेले डोंगरकडे आणि लाल मातीची वाट. असे सगळेच दृश्य मनभावन असते. फेरीत चालता चालता ‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ बालकवींची ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही.

काही जणांच्या मते ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा एक योग साधनेचा प्रकार आहे, तर काहींच्या मते ही तन-मनाला आनंद देणारी सहल आहे. तसे पाहता या प्रदक्षिणेला खूप मोठी परंपरा आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेदरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलित आहे.
सुुरुवातीच्या कालखंडात पहिले दोन श्रावण सोमवार त्र्यंबक येथे धार्मिक विधींसाठी गर्दी व्हायची. राखीपौर्णिमेपर्यंत पोथीपुराण पारायण आदी धार्मिक विधींची रेलचेल असायची.

त्यातून विविध व्यावसायिकांना उसंत मिळायची नाही. त्यामुळेच तिसर्‍या सोमवारी फेरीला प्राधान्य दिले जायचे. पूर्वी पाऊसदेखील खूप असायचा. नदी-नाले यांना पूर असायचा. पौर्णिमेपर्यंत पाऊस कमी होतो असे लोक मानत. त्यामुळे रस्ता शोधणे सोपे पडायचे म्हणूनही लोक शक्यतो तिसर्‍या सोमवारी फेरीस जायचे. पण आता ती परंपराच बनली आहे. साधारणत: 1996 सालानंतर तिसरा सोमवार अक्षरश: लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला आहे आणि आता तर तो शासन पातळीवर नियोजन करावे असा महत्त्वपूर्ण उत्सव झाला आहे.

तथापि तिसर्‍या सोमवारच्या आग्रहामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. या दिवशी लाखोंची गर्दी त्र्यंबकेश्वरात दाखल होते. प्रदक्षिणेत निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी फक्त चालण्यावर भर द्यावा लागतो. पहिला चालतोय म्हणून दुसराही चालतोय असाच अनुभव अनेकांना येतो. अनेकजण रात्रीची प्रदक्षिणा मारण्यावर भर देतात. पण रात्रीच्या अंधारात निसर्गाचे दर्शन कसे होणार? लोक चालता चालता वाटेवरची शेते तुडवतात. पिके पायाखाली आणतात. त्यामुळे नुकसान होत असल्याची तक्रार प्रदक्षिणेच्या वाटेवरच्या गावातील लोक करायला लागले आहेत. आजकाल काही जण व्यसन करून प्रदक्षिणा मारताना दिसतात. हुल्लडबाजी, ढकलाढकली करत चालतात. यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात.

ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी तज्ञांच्या मते काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रदक्षिणेला सुरुवात करताना उष:काळी सूर्योदयापूर्वी दोन तास उठून कुशावर्तावर स्नान करावे. श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गाक्रमण सुरू करावे. म्हणजे साधारणत: पहाटे 5 वाजता ही फेरी सुरू करावी म्हणजे सूर्योदय होताना प्रयागतीर्थास वळसा घालुन पेगलवाडीमार्गे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत बहरलेल्या निसर्गाचे अवलोकन करत शिवाचे नामस्मरण करत सात्विक मनाने फेरी करावी.

सकाळच्या वेळेस प्रदक्षिणा सुरू केली की जेथे हा अर्धा प्रवास संपतो तेथून होणारे ब्रह्मगिरीचे विलोभनीय दर्शन सगळा शिणभाग घालवते.सूर्यादयाच्या वेळी स्वर्गीय दृश्याची अनुभूती प्राप्त होते. पुढे चालण्यास बळ प्राप्त होते. मन ताजेतवाने होत असते. येथून पुढे परतीचा प्रवास सुरू होतो. आता बराचसा प्रदक्षिणा मार्ग सिमेंट काँक्रिटचा झाला आहे. त्यामुळे आता श्रावण महिन्यात केव्हाही प्रदक्षिणेस गेले तरी चालण्यासारखे आहे.

या सहलीचा आनंद घेण्यासाठी शक्यतो रात्री फेरी करणे टाळावे. दिवसाच्या निसर्गाचे दर्शन खरोखरच विलोभनीय असते. सोबत प्लॅस्टिक पिशवी आदी साहित्य नेऊ नये आणि ते इतस्त: टाकू नये. प्रदक्षिणा पूर्ण करताना पर्यावरणाची काळजी घेण्याची वेळ आता
आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!