‘जगात भारी 19 फेब्रुवारी’… शिवजयंतीची जिल्हाभर जोरदार तयारी

0

नाशिक । प्रतिनिधी
‘जगात भारी 19 फेब्रुवारी…’, ‘शिवराय मना-मनात आणि शिवजयंती घरा-घरांत…’ असे ब्रीद घेऊन सर्वत्र 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणारी शिवछत्रपती जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा सोहळा विविधतेने साजरा करण्यासाठी कार्यकर्ते एकवटल्याचे चित्र दिसत आहे.

रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अशा या घटनेच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा केला जातो. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’, अशी शिस्त शिवछत्रपतींच्या मावळ्यांची होती. हा वारसा जपण्याचे कार्य आजच्या शिवजयंतीनिमित्त शिवभक्त, इतिहासप्रेमी संस्था, संघटना व तालीम मंडळांकडून केले जात आहे.

शिवछत्रपतींनी दूरदृष्टीने लोककल्याणासाठी राबविलेल्या योजना, त्यांचे पुरोगामी विचार, शेती विषयक धोरण, संरक्षणाच्या उद्देशाने उभे केलेले गडकोट-किल्ले व विकसित केलेले युध्दतंत्र या व अशा इत्यंभूत इतिहासाची माहिती भावी पिढीला व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

इतिहास संशोधकांची व्याख्याने, शिवशाहिरांचे पोवाडे, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा अशा कार्यक्रमांनी शिवजयंती सोहळा साजरा केला जातो. या उत्सवाची शहरासह जिल्हाभर जोरदार तयारी सुरू आहे. जयंती समित्या कार्यान्वीत झाल्या आहे. प्रत्येक मंडळाकडून देखावे व मिरवणुकींचे नियोजन सुरू आहे.

अनेक मंडळे जिल्ह्यातील विविध गडांवरून तसेच काही थेट शिवनेरी गडावरून शिवज्योत आणुन जयंती साजरी करण्याची तयारी करत आहेत. शिवाजी महाराजांच्या मुर्ती बनविणार्‍या कारागिरांकडून मुर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे.

LEAVE A REPLY

*