Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सेतू कार्यालयाचे दहा लाखांचे डिपॉझिट जप्त

Share

नाशिक । प्रतिनिधी
मुदत संपल्यानंतरही कामकाज सुरू ठेवणार्‍या सेतू केंद्राला जिल्हा प्रशासनाने दंड ठोठावला असून त्याची दहा लाखांची बँक गॅरंटी जप्त करण्याची कारवाई केली आहे. तसेच, हे सेतू केंद्र बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या गुजरात इन्फोटेकला गतवर्षी जिल्हा प्रशासनाने दंड ठोठावला होता, त्याच कंपनीच्या ठेकेदाराकडून मुदत संपूनही सेतूचा कारभार सुरू होता.

मिशन अ‍ॅडमिशनमुळे शैक्षणिक दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयांमध्ये गर्दी वाढत आहे. दाखले वितरणाचे काम त्या त्या तालुक्यांमधील सेतू कार्यालये आणि महा-इ-सेवा केंद्रांकडून केले जाते. ग्रामीण भागात टेरासॉफ्ट कंपनीला, तर शहरात गुजरात इन्फोटेक कंपनीला हे काम दिले आहे.

सन 2016 मध्ये ऑनलाइन ई-निविदा प्रक्रियेद्वारे नाशिक शहर व नाशिक तालुका ग्रामीण सेतू केंद्र चालविण्यासाठी गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद यांना द़ि 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2019 या कालावधीकरिता सेतू केंद्राचे कामकाज करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. त्यानुसार या केंद्रांची मुदत द़ि 31 मार्च रोजी संपुष्टात आली होती.

दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे प्रशासकीय अडचण निर्माण होऊ नये, म्हणून या सेतू केंद्रांना द़ि 1 एप्रिल 2019 ते 23 मे या कालावधीसाठी तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली होती. असे असतानाही शहरातील सातपूर, सिडको, नाशिकरोड आणि मेरी येथील सेतू केंद्रांचे कामकाज सुरूच होते.

मुदत संपलेली असतानाही केंद्रांकडून विद्यार्थ्यांचे दाखल्यांसाठीचे अर्ज स्वीकारून त्यांना कच्ची पावती दिली जात आहे. अर्जासाठी अव्वाचा सव्वा शुल्क आकारले जात आहे. हा प्रकार किशोर खंडेलवाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे या प्रकरणाची तक्रार नोंदविली आहे.

या केंद्राची मुदत मे महिन्यातच संपुष्टात आल्याचे आणि त्यांना पुढील मुदतवाढ देण्यात आली नसल्याचे समजले. या प्रकाराची त्यांनी रीतसर तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!