Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विना परमीट १७० रिक्षा जप्त; शहरात दीड हजार रिक्षांवर कारवाई

Share

नाशिक । प्रतिनिधी
शहराच्या वाहतुकीस शिस्त लागावी आणि प्रवाशांची होणारी आर्थिक लुटमार थांबवण्यासाठी शहर पोलिसांतर्फे 25 नोव्हेंबर पासून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे 1 हजार 470 रिक्षांवर कारवाई करण्यात येऊन 3 लाख 60 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर परमीट नसणार्‍या 170 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरात 23 हजारपेक्षा अधिक रिक्षा दररोज धावत आहेत. मात्र यातील 10 हजार रिक्षांना परमीट नसल्याचे समोर येत आहे. मात्र, यातील वास्तव काय आहे याचा आतापर्यंत शोध घेण्याचे काम झाले नव्हते. शहरात खरोखर एवढ्या प्रमाणात रिक्षा धावतात काय, त्यांचा मार्ग कोणता, कोणत्या भागात रिक्षांची संख्या सर्वाधिक आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तर या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न शहर पोलिसांकडून सुरू आहे.

मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक न करणे, तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारे, गणवेश, बॅच नसणे, खासगी प्रवासी कंपनीस बेकायदेशीर करारनामा करून प्रवासी वाहतूक करणारे, परवाना नसलेेले, कागदपत्रे नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई सुरू आहे.

पोलिसांची कारवाई सुरू होताच अनेक रिक्षा रस्त्यावरून बेपत्ता झाल्या आहेत. शहर पोलिसांनी आठवडाभर वेळ बदलून आणि जागा बदलून कारवाई केली. शेकडोने रिक्षा जप्त करण्यात आल्यात. आता पोलिसांनी या कारवाईचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. शहरातील रिक्षांचे पारदर्शकपणे ऑडीट होणे आवश्यक आहे. याबाबतचे काम शहरातील पोलिस चौक्यांमधील कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांना आपल्या भागातील रिक्षा स्टॉप, त्यावरील रिक्षांची संख्या, रिक्षाचा मालक आहे किंवा चालक, स्टॉपवरील रिक्षा मीटरप्रमाणे चालतात काय?, शेअर रिक्षांचा मार्ग कोणते अशा अनेक बाबींची नोंद करण्यात येते आहे. ही माहिती पुढे एकत्रीतपणे संकलित करण्यात येणार आहे. याचा भविष्यात मोठा फायदा होईल, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

नऊ ठिकाणी स्टिग ऑपरेशन

मीटरप्रमाणे भाडे आकारणे महत्त्वाचे असून, मागणी केल्याप्रमाणे रिक्षा व्यावसायिकांनी ही सुविधा पुरवायला हवी. मात्र, शेअर रिक्षांच्या नावाखाली रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात. यास चाप बसविण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत 9 ठिकाणी स्टिंग ऑपरेशन राबविले. त्यात, साध्या वेषातील पोलिसांनी मीटरप्रमाणे भाडे आकारण्याची मागणी केली. मात्र, रिक्षाचालकांनी त्यास विरोध केला. या रिक्षाचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

२०० रिक्षा थांब्यांवर बोर्ड
शहरातील 263 रिक्षा थांब्याची पोलिस विभागाकडूत तात्पुरत्या स्वरूपात अधिसूचना काढण्यात आल्या आहेत. पैकी यातील 200 थांब्यांवर फलक लावण्यात येऊन त्यावर रिक्षांची संख्या नमूद करण्यात आली आहे; मात्र रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींकडे प्रत्येक थांब्यानिहाय माहिती असणे बंधनकारक असल्याचे पोलीस व आरटीओच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!