अनुसूचित जाती समिती जिल्हा दौर्‍यावर

0

नाशिक । राज्याची अनुसूचित जाती कल्याण समिती येत्या 28 तारखेपासून जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौर्‍यावर येणार आहे. आ. हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती विविध शासकीय विभागांमधील भरती, पदोन्नती, आरक्षण, अनुशेष, जातपडताळणीविषयक बाबींचा आढावा घेणार आहे.

दौर्‍याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.28) शासकीय विश्रामगृहावर सकाळी 9 वाजता समितीचे सदस्य जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात 10 वाजता जिल्ह्यातील नगरपालिकांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये 12 वाजता बैठक होणार आहे. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समाजकल्याण विभागाचा आढावा समिती घेईल. 3.30 वाजता नाशिक महापालिकेला समितीचे सदस्य भेट देणार असून 4.30 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात शहर व ग्रामीण पोलीस विभागाची बैठक होईल.

समितीचे सदस्य गुरुवारी (दि.27) जिल्ह्यातील मागासवर्गीय शाळा, वसतिगृहे तसेच यंत्रणानिहाय कामांना भेटी देतील. शुक्रवारी (दि.28) सकाळी 10 वाजल्यापासून शासकीय विश्रामगृहावर बैठका होणार आहेत. यामध्ये आरटीओ, राज्य उत्पादन, शालेय शिक्षण विभाग, आरोग्य व महावितरणाचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे. या दौर्‍यामुळे यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे.

समितीतील सदस्य
अध्यक्ष आ. हरिष पिंपळे. सदस्य आ. लखन मलिक, आ. मिलिंद माने, आ. राजू तोडसाम, आ. संगीता ठोंबरे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. बालाजी किणीकर, आ. गौतम चाबुकस्वार, आ. धनाजी अहिरे, आ. संध्यादेवी कुपेकर, आ. वर्षा गायकवाड, आ. भाई गिरकर, आ. प्रकाश गजभिये, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह ना. रा. थिटे (उपसचिव), आ. ब. राहाटे (अवर सचिव, समिती)

LEAVE A REPLY

*