कविता राऊतला ही उपजिल्हाधिकारी पद द्या : भुजबळ

0

नाशिक : ऑलिम्पिक स्पर्धेसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव अभिमानाने उंचविणाऱ्या नाशिकच्या धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांना शासनाच्या क्रीडा धोरणानुसार शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदासाठी नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्याची देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अभिमानाने मान उंचावणाऱ्या ऑलिम्पियन कविता राऊत नाशिक यांनी सन २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये कांस्य पदक प्राप्त केलेले आहे. सन २०१० मध्ये चीन येथे आयोजित एशियन गेम्स मध्ये एक रौप्य व एक कांस्य पदक त्यांनी प्राप्त केलेले आहे. सन २०१६ मध्ये गौहाटी येथे साऊथ एशियन गेम्स मध्ये सुवर्णपदक तर सन २०१६ साली रिओ, ब्राझील येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय दि.३० एप्रिल २००५ नुसार राज्याच्या आंतरराष्ट्रीय /राष्ट्रीय / राज्य स्तरावर उलेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती व ५% आरक्षण योजनेअंतर्गत सामावून घेण्यात येत आहे. तसेच दि.१ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली तर शासन सेवेत थेट नियुक्ती प्राप्त होवू शकेल याची मानके देखील निश्चित करून देण्यात आलेली आहेत. सदर शासन निर्णयातील वर्ग १ साठी असलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ऑलिम्पियन श्रीमती कविता राऊत यांनी प्राविण्य संपादित केलेले आहे.

            सन २०१६ मध्ये कविता राऊत यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना  वर्ग ३ मध्ये आदिवासी विकास भवन येथे नियुक्ती देण्याचे महाराष्ट्र शासनाद्वारे प्रस्तावित होते. पदवी धारण केलेली नसल्यामुळे क्रीडा विभागाने त्यांच्या नावाचा वर्ग १ पदावर विचार केला नाही. परंतु दि.२८ जून २०१७ रोजी त्यांनी बी.ए.पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून त्या वर्ग १ पदासाठी पात्र आहेत. मात्र कविता राऊत यांची जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर नेमणूक प्रस्तावित असल्याचे समजते. तसेच नुकतेच श्रीमती ललिता बाबर यांची उपजिल्हाधिकारी पदावर तर राहुल आवारे, विजय चौधरी या क्रीडापटूंची पोलीस उपअधिक्षक पदावर नेमणूक करण्यात आलेली असल्याचे सांगून ऑलिम्पियन कविता राऊत यांनी तर चार आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील नैपूण्याचा विचार करत शासनाच्या क्रीडा धोरणानुसार त्यांची उपजिल्हाधिकारी वर्ग-१ या पदावर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

*