‘पुनद’ पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर पुर्ण करणार : चंद्रकांत पाटील

0

नाशिक : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर ‘पुनद पाणीपुरवठा’ योजनेचा शुभारंभ झाला असून, या योजनेचे काम लवकर पुर्ण करणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सटाणा येथील पाठक मैदानावर आयोजित विविध विकासकामांचे भूमिपुजन व उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. दिलीप धोंडगे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, सटाणा शहर व तालुक्यातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्नांचा डॉ. भामरे यांनी केंद्र व राज्य शासनस्तरावर पाठपुरावा करून पिण्याचे पाणी, रस्ते, शेती, सिंचन आदी विकासकामांना गती दिली आहे. केंद्र व राज्य शासनाने गेल्या काही वर्षांत जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शेती, पाणी, आरोग्य, शिक्षणाबाबत समस्यांवर मात करण्यासाठी विविध योजना आणाल्या आहेत. बागलाण तालुक्यात आज विविध विकासकामांच्या माध्यमातून विकासाचा रथ आला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

डॉ. भामरे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आज बागलाण तालुक्यातील वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. सटाणा शहराचे व तालुक्याचे रस्ते, शेती व सिंचनाचे प्रश्न सुटणार आहेत.
श्री. रावल म्हणाले, संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे स्मारक येत्या काही दिवसात उभारणार येणार आहे. तसेच बागलाण तालुक्याला नैसर्गिक संपत्तीचा वारसा लाभल्याने आनंदसागर सारखा भविष्यात टुरिझम प्रकल्प राबविण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते तळवाडे भामेर पोहच कालवा 25 ते 27 किलोमीटरचे बांधकाम शुभारंभ, वाढीव केळझर चारी क्र. 8 सर्वेक्षण व हरणबारी उजवा व डावा कालवा सर्वेक्षणाचा शुभारंभ, केळझर चारी क्र. 8 चे भूमिपुजन, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पूल व रस्त्यांचे भूमिपूजन, मुख्यंमत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सुमारे 25 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत 30 गावांमधील कामांचा शुभारंभ व आदिवासी विकास विभागांतर्गत 5 गावांचे सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी नगरपालिका सुशोभिकरणासाठी संरक्षण विभागामार्फत मिळालेल्या रणगाड्याचे लोकार्पण श्री. पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

*