Video : डोळ्यांचे पारणे फेडणारा बंगाली पद्धतीचा नाशिकमधील दुर्गोत्सव

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वेगवेगळ्या नोटप्रेस नाशिकमधील गांधीनगर येथे स्थापन झाल्या. त्यावेळी याठिकाणी गुजराती, बंगाली यांच्यासह अनेक नागरिक येथे रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झाले. येथील नागरिकांनी तेथील रूढी परंपरा जपत सन उत्सवांना चालना देत नाशिकमध्ये गांधीनगर परिसरात बंगाली सांस्कृतिक कार्यक्रमांची चर्चा उत्तर महाराष्ट्रात घडवून आणली.

यातूनच पुढे सार्बोजनीन(सार्वजनिक) दुर्गा देवी समितीची स्थापना करण्यात आली. त्यांच्याकडून दुर्गा देवीची नवरात्रात षष्ठीला स्थापन होऊ लागली. आज जवळपास तिसरी पिढी ही परंपरा जपत असून  काळानुरूप या उत्सवाला अत्याधुनिक स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते आहे.

विशेष म्हणजे बंगालमधील मूर्तीकार गंगा नदीची माती गांधीनगरला आणतात. त्याच ठिकाणी देवीची मूर्ती घडवली जाते. मूर्तिकार गौतम पाल आणि त्याचे पूर्वज यांच्याकडून वर्षनुवर्षे ही आकर्षक मूर्ती साकारली जात असून यंदाचे  64 वे वर्ष बंगाली बांधव नवरात्रोत्सव साजरे करतांना दिसून येत आहे.

याठिकाणी भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय दुर्गादेवीची आकर्षक मूर्ती हे यंदाचे वैशिष्ट्य असून सकाळ, दुपार व संध्याकाळ याठिकाणी गुजराती, बंगाली भाविकांसह मारवाडी, सिंधी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सध्या असून गांधीनगरला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सार्बोजनिन दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता, उपाध्यक्ष दिपक घोष, खजिनदार बीरुदास गुप्ता व समिती सदस्यांनी तयारी पूर्ण केली असून ही सर्व मंडळी नवरात्रोत्सव जल्लोषात पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

यावेळी अध्यक्ष सुजॉय गुप्ता यांनी सांगितले की, उत्सवाचा आनंद द्विगुणित करताना गंगेचे पावित्र्य अबाधित राहावे व पर्यावरणाचा समतोल साधला जावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. उत्तर महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा दुर्गा उत्सव आहे.

पर्यावरण जागृतीचा संदेश देत दसर्‍याला अग्निशामक दलाचा बंब बोलावून या मूर्तीचे जागेवरच विसर्जन केले जाते. बंगाली बांधव कुठेही शहरात गाजावाजा करत नाहीत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक वर्षांपासून देवीचे याच ठिकाणी विसर्जन केले जात असल्याची माहिती अध्यक्ष सुजॉय गुप्ता यांनी दिली.

उपाध्यक्ष दिपक घोष, खजिनदार बीरुदास गुप्ता, शंकर डे, डा. रिता कुंडू, श्वेता गुप्ता, रीना घोष आदी पदाधिकारी संयोजन करत आहेत.

उत्सव काळात सकाळ-संध्याकाळ पूजा आरती केली जाते. आकर्षक मूर्ती, भव्य मंडप, सांस्कृतिक कार्यक्रम हे दुर्गापुजेचे वैशिष्ट्य आहे. सुप्रसिद्ध गायिका प्रमिला दातार, हेमलता, इकबाल दरबार, जसपाल सिंह यांसह दिवंगत संगीतकार रविंद्र जैन आदी दिग्गज कलाकारांनी येथे कला सादर केली आहे.

बॅले कलाकार सचिन शंकर, ऑकेस्ट्रा झपाटा, सेव्हन कलर्सने येथे एक काळ गाजवला होता, अशी माहिती एलआयसीचे सेवानिवृत्त अधिकारी सुभ्रेदू विकास सरकार यांनी देशदूतला दिली.

सार्बोजनिन दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता म्हणतात…

Dinesh Sonawane, Sanjay Lolge Deshdoot Digital Nashik 

LEAVE A REPLY

*