Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

अकोला ते सारंगखेडा घोड्यावरुन ३१४ किमीचा प्रवास; वयाच्या अकराव्या वर्षी तो ठरला छोटा ‘अश्ववीर’

Share

नाशिक | नील कुलकर्णी
वय अवघे ११ वर्ष. मनात जिद्द, अश्‍वाबद्दल अपार प्रेम, तब्बल ८ ते दहा तासांचा दररोजचा घोडयावरचा प्रवास, ३५० किमीचे अंतर, वाढलेला गारठा आणि कुठलेही आच्छादन नसलेल्या अश्‍वसफारीचा संघर्षमय आणि आव्हानात्मक प्रवास. कधी एक वेळ जेवण तर कधी उपवास. आव्हाने पत्करुन ध्येय गाठले. घोडेस्वारीने शरीरावर मोठे फोड आलेले. काही भाग सोलवटून निघालेला. पाय सुजले, थंडीनेे सर्दीचा त्रास दिला. मात्र सारंगखेडा पोहचताच जग जिंकल्याचा आनंद झाला. हा अनुभव आहे, अकोला ते सारंगखेडा घोड्यावरुन प्रवास करुन पोहचलेल्या राजबीर सिंगचा.

‘बाज’ नावाच्या घोड्यावरुन अकोल्याहून खास सारंगखेडा महोत्सवासाठी आलेल्या १२ वर्षीय राजबीर सिंग महोत्सवातील सर्वात कमी वयाचा अश्‍वप्रेमी. त्याला साहस आणि नावीन्याचा ध्यास हा त्याला वडिलांच्या संस्कारात मिळालेला. विदर्भातील अकोला ते उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे अश्‍वप्रेमाचा संदेश देण्यासाठी हा चिमुरडा घोड्यावरुन निघाला साथीला घरच्या मंडळींची साथ होतीच. मात्र हा प्रवास नक्किच सोपा आणि सरळ नव्हता.
थंडीचे आव्हान आणि सतत घोड्यावरुन प्रवास केल्यामुळे त्याच्या शरीरावर छोटे मोठे फोड आलेले. शिवाय घोड्याला आवरण नसल्यामुळे थंड हवा, तपमानातील विसंगती, ऊन, वारा याचा परिणाम त्याच्या शरीरावर झालेला. तरीही जिद्द न सोडता हा प्रवास आव्हान मानून या पठ्ठ्यानेे अकोला ते सारंगखेडा हा सुमारे साडेतीनशे किमीचा प्रवास घोड्यावरुन यशस्वी करत सर्वात कमी वयाचा मोठा अश्‍वप्रवास करणारा ‘वीर’म्हणून नाव कमावले.

त्याच्या या अश्‍वप्रेमाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार करताच माझ्या कष्टाचे सार्थक झाले असे उद्गार त्याने काढले. या सार्‍या आव्हानात्मक प्रवासात आपला बाज अश्‍वाने खरी बाजी मारली असे उद्गार काढत तो याचे श्रेय वडिल आणि बाजला देतो.

जिद्द , चिकाटी आणि संकटे, आव्हानासमोर डगमगून न जाता जबरदस्त इच्छाशक्तीने तुम्ही असाध्य ते साध्य करु शकतातत याचा परिपाठ त्यांनी आपल्या कर्तबगारीने अश्‍वनगरीसमोर ठेवला. इतकेच नव्हे तर नवी पिढी, गझेटमध्ये अडकली असून प्राणीप्रेम कमी झाले हा आरोप त्याने साफ खोटा ठरवत इतरांनाही प्रेरणा दिली. आहे.

तिसर्‍या वर्षांपासून अश्‍वसवारी
वयाच्या तिसर्‍या वर्षांपासून मी घोडेसवारी करतो. इतक्या दूर आल्यानंतर पर्यटन विभागाचा टेंट आम्हाला मिळाला नाही. खाण्याचे खूप हाल झाले. तीन दिवस मला जेवण मिळाले नाही. माझ्या शरीरावर फोड आले. बसण्याचा भाग सोलवटून निघाला. मात्र जिद्द हरलो नाही. या प्रवासात ‘बाज’ मुळेच मी ‘बाजी’ जिंकलो. सारंगखेडा महोत्सवाकडे आपण केवळ बाजार म्हणून न बघता अश्‍वप्रेमाचा संदेश देणारा महोत्सव म्हणून बघावे आणि प्राण्याप्रती‘बांधिलकी’ वृद्धीगत करावी.
-राजबीर सिंग
अश्‍वप्रेमी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!