Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिकमधील सराफ बाजार १७ मे पर्यंत बंद राहणार; सराफ असोसिएशनचा निर्णय

नाशिकमधील सराफ बाजार १७ मे पर्यंत बंद राहणार; सराफ असोसिएशनचा निर्णय

file photo

नाशिक | प्रतिनिधी 

- Advertisement -

सराफ बाजार १७ मे पर्यंत बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने घेतला आहे. याबाबत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी ‘देशदूत’ला माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या कालच्या निर्णयानुसार सराफी व्यावसायिकांनी आज सकाळी दुकाने सुरु करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र,  कालच नाशिक शहरासह देवळाली कॅम्प परिसरात करोनाचे रुग्ण वाढले आहेत.

अर्थचक्राला चालना देण्यासाठी काही दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरीदेखील नागरिकांसह स्वतःची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिक केंद्राने जाहीर केलेले लॉकडाऊनचे १०० टक्के पालन करून येत्या १७ मे नंतर दुकाने सुरु करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

करोनामुळे गेल्या ४० पेक्षा अधिक दिवस संपूर्ण नाशिक शहर लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. देशात करोनाच्या उद्रेकानंतर नाशिक बरेच दिवस नियंत्रित होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालेगाव व येवल्यात अधिक रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

दुसरीकडे शहरातीलही रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. यामुळे सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित वापर करणे, प्रशासनाने परवानगी दिली असली तरीदेखील ग्राहकांसोबतच सराफ व्यावसायिकांनादेखील काळजी घ्यावी लागणार आहे.  यामुळे अतिरिक्त ताण व्यावसायिकांवर पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यातून आज सर्वानुमते सराफ व्यवसाय येत्या १७ मे पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सराफ व्यावसायिक संभ्रमात

काल जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी एकल दुकाने सुरु करण्याबाबत आदेश दिले होते. त्या आदेशांचे पालन करत सराफ दुकाने सकाळच्या सुमारास उघडण्यात आली होती. मात्र, याठिकाणी पोलीस यंत्रणा दाखल होऊन होऊन त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या वेगवेगळ्या निर्णयावरून सकाळपासून सराफ व्यावसायिक संभ्रमात होते. यानंतर सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या