Type to search

‘समृध्दी’ सांठी 22 हेक्टरवरील वृक्षांवर कुर्‍हाड; गौणखनिजासाठी डोंगरांना सुरुंग

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘समृध्दी’ सांठी 22 हेक्टरवरील वृक्षांवर कुर्‍हाड; गौणखनिजासाठी डोंगरांना सुरुंग

Share

नाशिक । कुंदन राजपूत
नागपूर – मुंबई ‘समृध्दी’ महामार्ग नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यातून जात असून येथील वनविभागाच्या अख्त्यारीतील 39 हेक्टर जमीन हस्तांतरणाला नागपूर येथील अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने अटीशर्तीसह तत्वत: मान्यता दिली आहे. महामार्गाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी 39 पैकी 22 हेक्टरवरील जमीनीवरील हजारो वृक्षांवर कुर्‍हाड चालविली जाणार आहे. परिणामी येथील वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येणार असून जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे.

‘समृध्दी’ महामार्ग हा 702 किलोमीटरचा असून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व ईगतपुरी तालुक्यातील 102 किलोमीटचा समावेश आहे. ‘समृध्दी’साठी जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक जमिनीवर अगोदरच वरवंंटा फिरविण्यात आला आहे. जिल्ह्यात महामार्गाचा मार्ग प्रशस्त होण्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाच्या हद्दीत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील शिरवडे, घोरवड व खंबाळे येथील 17.81 हेक्टर व सिन्नर तालुक्यातील फांगुळगव्हाण व बोरली येथील 20.887 हेक्टर जमिन हस्तांतरणाचा अडथळा होता. नियमानूसार वनजमिनीचे भूसंपादन व हस्तांतरणसांठी नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचा ग्रीन सिग्नल मिळणे गरजेचे असते. मागील दीड वर्षापासून राज्य शासनाकडून परवानगी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. अखेर 39 हेक्टर जमिन राज्य शासनाकडे हस्तांंतरणास 36 अटीशर्तींसह तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.

या अटीशर्तींचे पालन करण्याची जबाबदारी राज्यशासन व महामार्ग बांधणार्‍या कंत्राटदारावर असेल. परवानगीं मिळाल्याने ‘समृध्दी’साठी पर्यावरणाची राखरांगोळी करत हजारे वृक्षांवर कुर्‍हाड चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 39 हेक्टर पैकी आवश्यक त्या ठिकाणीच वृक्ष तोड केली जाईल. ज्या ठिकाणी डोंगर असेल तेथे बोगदे तयार केले जाईल, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, महामार्गासाठी या दोन्ही तालुक्यातील तब्बल 22 हेक्टरवरील हजारो दुर्मिळ वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे येथील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येण्याची भीती आहे. एकूणच ‘समृध्दी’च्या गोंडस नावाखाली पर्यावरणावरच घाला घालण्याचे काम सुरु आहे.

‘समृध्दी’साठी डोंगरांना सुरुंग
महामार्गाच्या कामासाठी मोठया प्रमाणात दगड, मुरुम, खडीची गरज असून त्यासाठी जिल्ह्यातील डोंगरांना सुरुंग लावण्याची तयारी सुरु आहे. एक लाख ब्रास गौणखनिज उत्खननासाठी पर्यावरणाशी निगडीत परवानग्यांची पूतर्ता करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट असल्याने या गौणखनिजावरील कोटयवधीची रॉयल्टी देखील माफ करण्यात आली आहे. एकूणच वनसंपदे बरोबरच डोंगर देखील पोखरले जाणार आहेत.

प्रमुख अटीशर्ती
39 हेक्टर वनजमिनीच्या मोबदल्यात नाशिक जिल्ह्यात अथवा राज्यात तेवढीच जमीन वनविभागाला उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. सध्या या जागेसाठी अकोला जिल्ह्यात जमिन दिली जाईल असे समजते. शिवाय जेवढ्या वृक्षांची कत्तल केली जाईल, तेवढया वृक्षांची दुसर्‍या ठिकाणी लागवड करणेे महामार्ग बांधणार्‍या कंत्राटदराला बंधनकारक असेल. त्या वृक्षांचे सगोपनासाठी दहा वर्षासाठीचा खर्च आगाऊ द्यावा लागेल. ज्या वृक्षांची कत्तल करण्यात आली त्यांच्या वाहतुकीचा खर्च कंत्राटदाराला करावा लागेल.

जमीन हस्तांतरणाला अटीशर्तीसह तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. जेवढया जागेचे हस्तांतरण होईल तेवढी जागा शासनाकडून इतर ठिकाणी वनविभागाला उपलब्ध करुन देईल.
– शिवाजी फुले, उपवनसंरक्षक, नाशिक पश्चिम वनविभाग

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!