Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : समृद्धीच्या कामावरील पोकलँडची अज्ञातांकडून तोडफोड

Share

सिन्नर । अजित देसाई :
समृद्धी महामार्गाच्या वावी फेज क्रमांक १२ मधील भरावाचे काम करण्यासाठी मिरगाव शिवारात जाम नदीपात्रात माती व मुरुमाचा उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनची आज (दि.६) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. मोठे दगड टाकून मशीनची तोडफोड करण्यासोबतच सुमारे दोनशे लिटर डिझेल देखील या व्यक्तींनी चोरून नेले आहे.

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत नदीपात्रात खोदकाम सुरू होते. पावसाची रिपरिप सुरू झाल्याने व रात्रीच्या वेळी वाहने चालणे अवघड होईल म्हणून ठेकेदाराकडून खोदकाम बंद करण्यात आले.

चालक रात्री जेवणासाठी वावी येथे आला होता. मात्र पावसामुळे त्याला मशीन जवळ पोहोचणे शक्य झाले नाही. पावसाच्या रिपरिपीमुळे नदीपात्रात असणाऱ्या मशीन जवळ कोणी जाणार नाही असा अंदाज करत चालक मध्यरात्री उशिरा तेथे पोहोचला.

यावेळी मशीनच्या चालक केबिनच्या काचांची तोडफोड करण्याबरोबरच मोठमोठे दगड टाकून मशीन चे नुकसान करण्यात आले. परिसरात नदीपात्रातून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर मधून वाळूची चोरी केली जाते. अवैध उपसा करणार्‍या या चोरांकडून यापूर्वी अनेकदा समृद्धीच्या कामासाठी होणाऱ्या खोदकामाला विरोध करण्यात येत होता. आज रात्रीचा प्रकार वाळू चोरट्यांकडून करण्यात आला असावा असा संशय आहे.

समृद्धीच्या वावी ते सोनारी टप्प्याचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनी मार्फत केले जात असुन दुशिंगपुर ते सायळे दरम्यानच्या मार्गावर भराव टाकण्याचे काम श्याम बिल्डकॉन या कंपनीने सुरू केले आहे. याच कंपनीचा पोकलॅण्ड मीरगावच्या जामनदी पात्रात खोलीकरण करून मुरूम व मातीचा उपसा करत होता.

दरम्यान याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून तहसीलदार व रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील सुचित करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!