Fixtures

Live & Upcomming Completed STATS Standings

Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जगप्रसिद्ध निर्यातक्षम ‘आरा’ द्राक्ष व्हरायटीची सूत्र नाशकातून हलणार

Share

Fixtures

नाशिक | प्रतिनिधी

द्राक्षाच्या सुप्रसिद्ध (ARRA) ‘आरा’ कॅलिफोर्निया जातींचे (व्हरायटी) उत्पादन आणि विक्रीचे भारतातील सर्वाधिकार सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला मिळाले आहेत. कृषी क्षेत्रातील अग्रगण्य ज्युपिटर या ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपनीने हे अधिकार सह्याद्रीला दिले आहेत. ‘ज्युपिटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह व्यवस्थापकीय संचालक मार्क ट्विडल यांच्या उपस्थितीत मोहाडी (ता. दिंडोरी) येथे सह्याद्री फार्म्सच्या मुख्यालयात नुकत्याच या करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या आहेत.

 ‘सह्याद्री’चे चेअरमन आणि व्यवस्थापक विलास शिंदे यांनी बुधवारी (दि. 3 जुलै) रोजी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी संचालक श्रीराम ढोकरे, रवींद्र बोराडे आणि अझहर तंबुवाला उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांत द्राक्ष उत्पादक बदलते प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च, टिकवणक्षमता, उत्पादकता, रोगप्रतिकारक आणि निर्यातक्षम द्राक्ष जातींचा अभाव आणि महत्त्वाचे म्हणजे बाजारपेठेच्या समस्या आदी अनेक तर्‍हेच्या समस्यांनी त्रस्त झाले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर सह्याद्री फार्म्सच्या प्रयत्नांमुळे अधिक उत्पादकता, कमी उत्पादन खर्च, निर्यातक्षम अशी वैशिष्ट्ये असलेल्या ‘आरा’च्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरा’ मुळे उत्पादन खर्चात सुमारे 20 टक्के कपात होऊन उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

एखाद्या फळपिकाच्या जागतिक व्हरायटीचे देशातील सर्वाधिकारी मिळविणारी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे.

देशाच्या फलोत्पादन नव्हे तर कृषिक्षेत्रातील ही अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद घटना आहे, असे शिंदे यांनी सांगितले. सह्याद्रीशी संलग्न सभासद शेतकऱ्यांसाठी पेटंटेड ‘आरा’ व्हरायटी उपलब्ध झाल्या असून अन्य इच्छुक शेतकऱ्यांसाठी ‘आरा’ची नोंदणी सह्याद्रीने सुरू केल्याचेही शिंदे म्हणाले.

आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, देवाण-घेवाण किंवा भागीदारीचे करार साधारणतः दोन देशांमध्ये किंवा सरकारी संस्था अथवा मोठ्या कंपन्यांमध्ये होतात. त्यासाठी सरकारी आणि अन्य स्तरांवरून सतत प्रयत्न सुरू असतात. देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्सने युरोपातील कंपनीशी थेट करार देशाच्या कृषी क्षेत्रात नवे पर्व आरंभ केला आहे.

निर्यातक्षम व जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या ‘आरा’ द्राक्ष व्हरायटीचे सर्वाधिक अधिकार सह्याद्रीसारख्या देशातल्या आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपनीला मिळाल्याने केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांना विशेषतः छोट्या शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

द्राक्षामधील जागतिक पायाभूत सुविधा आणि जागतिक बाजारपेठेचा फायदा मिळणे सह्याद्रीमुळे शेतकर्‍यांच्या आवाक्यात आले आहे. द्राक्षे उत्पादन आणि विक्रीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. ‘आरा’ व्हरायटींमुळे आगामी काळात राज्याच्या आणि अर्थातच ‘ग्रेप कॅपिटल’ समजल्या जाणार्‍या नाशिकच्या द्राक्ष उत्पादन क्षेत्रात क्रांतिकारी बदल अपेक्षित असल्याचेही शिंदे याप्रसंगी म्हणाले.

‘आरा’ व्हरायटीच्या प्रक्षेत्र चाचण्या नाशिक परिसरात घेण्यात आल्या होत्या. त्या अत्यंत यशस्वी ठरल्या. सन २०१९ अखेर ‘आरा’व्हरायटीची ४० हेक्टरवर लागवड अपेक्षित असून २०२० साली ‘आरा’ची तीनही रंगातील द्राक्षे निर्यातीसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. २०२३ पर्यंत लागवडीखालील क्षेत्र २ हजार हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.


आरा’ जातीचे वाण

 • व्हाईट – आरा १५, ३०, ८ A-१९+४इत्यादी
 • रेड – आरा १३, १९, २८,२९ इत्यादी
 • ब्लॅक – आरा २७, ३२, A १४ इत्यादी

वैशिष्ट्ये 

 • साखर-अ‍ॅसिडचे उत्तम संतुलन (१९ ते २० ब्रिक्स)
 • संजीवकांचा कमी आवश्यकता त्यामुळे उत्पादनखर्च कमी
 • मण्याचा आकार २२ ते ४२ मि.मी.
 • अत्यंत उपजाऊ जाती, मोठा व टिकाऊ घड
 • पावसाला व प्रतिकूल हवामानास  प्रतिकारक्षम
 • उष्णकटिबंधीय तसेच वाळवंटी प्रदेशातही योग्य
 • हेक्टरी २७ ते ३५ टनापर्यंत उत्पादकता
 • रंगीत व्हरायटी अत्यंत देखण्या व टिकाऊ रंग
 • खाण्यास कुरकुरीत व भरपूर गर,उत्तम चव
 • उत्तम टिकवणक्षमता (शेल्फ लाइफ)
 • निर्यातीसाठी सर्वोत्तम जात

हा तर देशाचा बहुमान

सह्याद्री आणि ज्युपिटर कंपनीचे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून संबंध आहेत. ही कंपनी आमची द्राक्षातील सर्वांत मोठी व्यावसायिक भागीदार आहे. हा आमचाच नव्हे तर देशाचा बहुमान आहे. ‘आरा’ व्हरायटीचे भारतातील अधिकार सह्याद्रीला मिळणे ही आजवरचा व्यावसायिक विश्‍वास आणि नात्यांमधून घडून आलेली मोठी घटना आहे. भविष्यात आमच्या भागीदारीतून अनेक चांगल्या प्रकल्पांना सुरवात होणार आहेत.

 -विलास शिंदे, चेअरमन व एम.डी. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मोहाडी (नाशिक)


द्राक्षाची गणिते बदलणार

द्राक्षाच्या ‘आरा’ व्हरायटीचे भारतातील सर्वाधिकार सह्याद्रीला दिल्याने आमचे व्यावसायिक नातेसंबंध आणखी वृद्धींगत होणार आहेत. मी ठामपणे आणि विश्‍वासाने सांगतो की ‘आरा’सारख्या दर्जेदार व्हरायटीमुळे भारतीय उपखंडातील द्राक्षाच्या मागणीची गणिते बदलून जाणार आहेत. भारतातील टेबल ग्रेप्सला (खाण्याची द्राक्षे) जगभरात मागणी वाढणार आहे.

– मार्क ट्विडल, ‘ज्युपिटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह व्यवस्थापकीय संचालक


उत्पादक, ग्राहकांना फायदा

आरा व्हरायटीचे भारतातील अधिकार सह्याद्रीला मिळणे हे ऐतिहासिक आहे. भारतातील द्राक्ष उत्पादकांसाठी दर्जेदार अधिक उत्पादन देणार्‍या द्राक्ष व्हरायटी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. ‘आरा’ व्हरायटीच्या रुपाने सह्याद्रीने अतिशय दर्जेदार, उच्च दर्जाची आणि अधिक उत्पादन देणारी द्राक्ष व्हरायटी आणली आहे. याचा उत्पादक आणि ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.”

– अझहर तंबुवाला, संचालक (मार्केटिंग), सह्याद्री फार्म्स. 


 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!