ग्रामीण पोलीस बदल्यांबाबत उलटसुलट चर्चा; शहर, जिल्ह्यात हजार कर्मचार्‍यांच्या बदल्या

0
नाशिक : राज्यभरात झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांनंतर आता जिल्ह्याच्या शहर तसेच ग्रामीण पोलीस दलातील सुमारे 900 पेक्षा अधिक पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या येत्या दोन दिवसांत होत आहेत. यामुळे शेकडो कर्मचार्‍यांचे लक्ष प्रशासकीय बदल्यांकडे लागले आहे.

पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे. 30 मे रोजी ते पदभार सोडण्याची शक्यता आहे. परंतु या कालावधीत अचानक होणार्‍या कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चा आहे.

पोलीस स्टेशनमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांची पाच वर्षांनी तर साईड ब्रॅच म्हणजे एसबी, मुख्यालय अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची दर तीन वर्षांनी बदली होते. साधारणतः दरवर्षी एक तृतीयांश कर्मचार्‍यांची बदली होते. शहर पोलीस दलात जवळपास दोन हजार 500 कर्मचारी असून, त्यातील जवळपास 600 ते 650 कर्मचार्‍यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे.

ग्रामीण पोलीस दल देखील या निकषानुसार यादी तयार करीत असून ग्रामीण पोलीस दलातील 325 कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाच्या अंतिम याद्या दोन दिवसात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहर पोलिसांची हद्द आणि वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांबाबत पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकुश शिंदे यांची पदोन्नतीवर नागपूरला बदली झाली आहे. परंतु मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली होऊनही त्यांना पदभार सोडता आला नव्हता. तसेच नवे पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संजय दराडे यांनाही पदभार स्वीकारता आलेला नाही. मालेगाव निवडणूक संपली असून आता, 30 मे रोजी ते शिंदे आपला पदभार सोडण्याची शक्यता आहे.

परंतु तत्पूर्वीच बदलीची यादी तयार झाली असल्याने व त्यांच्या सुचनेनुसार बदल्या होणार असल्याने याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. बदली झालेल्या असताना अधीक्षकांना बदल्या करताता येतात काय ? हे कोणत्या नियमात आहे यावर चर्चा झडत असून काही नाराज कर्मचारी वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*