फरार कवळे अखेर जेरबंद; सांगलीतून अटक

0
नाशिक | ग्रामीण पोलिसांच्या हातावर तुरी देत तालुका पोलीस ठाण्यातून फरार झालेला सराईत दरोडेखोर संभाजी कवळे यास अखेर महिनाभराच्या प्रयत्नानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला काल सांगली येथून ताब्यात घेण्यात आले.

१५ मे रोजी पोलीस ठाण्यातूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन संभाजी कवळे फरार झाला होता. कवळे फरार झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

संभाजी विलास कवळे (वय २३, रा. औदुंबर प्लाझा, औदुंबर नगर, अंबड लिंकरोड, मुळ कोल्हापूर) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे.

शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लाखलगाव परिसरातील गौरव पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्‍या सात संशयितांना शिताफीने अटक केली होती. यामध्ये कावळेचा सहभाग होता. या गुन्ह्यात टोळीतील सराईत गुन्हेगारांनी दरोड्यासह दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शहर पोलिसांनी सर्व गुन्ह्यामधील एकूण सात लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल संशयितांकडून जप्त केला होता. यानंतर सर्व संशयीतांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

नाशिक तालुक्यातील मातोरी येथे घरफोडी केल्याची कबुली कवळेने दिली होती. शहर पोलिसांचा तपास पूर्ण झाला असल्याने मातोरी येथील घरफोडीचा तपास करण्यासाठी तालुका पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी कवळेला ताब्यात घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

त्यास मंजुरी मिळाल्याने तालुका पोलिस ठाण्याच्या एका पथकाने कवळेचा मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेतला होता. त्यानुसार त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर, चौकशी करीता कावळेला तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.

या पोलिस ठाण्यामध्ये कोठडी नसल्याने कवळेला एका कोपर्‍यात लोखंडी बाकडावर बसवण्यात आले होते.  त्याची बेडी लोखंडी बाकडाला अडकविण्यात आली होती. दरम्यान, सांयकाळी ५.२० च्या सुमारास पोलीसांचे लक्ष नसल्याचे पाहुन त्याने शिताफीने बेडीतून अलगद हात काढून घेत  धूम ठोकली.

कवळेने तालुका पोलिस स्टेशनच्या मागील बाजुने भुमिअभिलेख कार्यालयाच्या भिंतीवरून उडी मारून  सीबीएसच्या दिशेने तो फरार झाला. १० ते १५ मिनीटांनी कवळे फरार झाल्याची बाब तेथील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी लागलीच शोध मोहिम सुरू केली होती.

अखेर सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील मंगरूळ येथून त्यास पोलिसांनी अटक केली.

पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपविभागीय अधिकारी पेठ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.बी ठोंबे सहाय्यक निरीक्षक के. एएम कमलाकर, जयेश भाबड योगेश शिंदे यांनी ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

*