Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वावी : शेळी कापून चोरट्यांचा मटणावर ताव; पन्नास हजारांची रक्कमही लांबवली

Share

वावी । वार्ताहर

शहा रस्त्यालगत एकनाथ रघुनाथ शेळके यांच्या मळ्यातील बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी 50 हजार रुपयांची रक्कम लांबवली. रविवारी (दि.7) मध्यरात्री घडलेल्या या घटनेत घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत भूक शमवण्यासाठी चोरट्यांनी पडवीत बांधलेल्या शेळीचा बळी घेतला.

घरातील विळीच्या साह्याने मारलेल्या शेळीचे कातडे व पोटातील अनावश्यक भाग प्लास्टिक कागदात गुंडाळून घराशेजारच्या शेततळ्याजवळ फेकून देत चोरट्यांनी पलायन केले. या सेवानिवृत्त शिक्षक शेळके यांचा शहा रस्त्यापासून सुमारे 1 किमी अंतरावर बंगला आहे. शेळके पत्नीसोबत तेथे वास्तव्य करतात. निखिल हा विवाहित मुलगा वावीत राहतो.

शुक्रवारी (दि.5) शेळके यांनी बँकेतून 60 हजार रुपये काढून घरी आणले होती. ही रक्कम त्यांनी घरातील कपाटात ठेवली. याच दिवशी सायंकाळी मुलीच्या सासरी तातडीने चाळीसगाव येथे पती-पत्नी घराला कुलूप लावून गेले.

शनिवारी सायंकाळी मुलगा निखिल पडवितील शेळीला चारा- पाणी करुन, गावातील घरी आला होता. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तो मळ्याकडे आला असता घरालगतच्या शेत तळ्याजवळ प्लास्टिक कागद पडलेला दिसला. घरातील कागद बाहेर कसा आला, या विचाराने तो पुढे गेला असता शेळीचे कातडे व आतडे त्यात गुंडाळल्याचे त्याला दिसले.

निखिल तातडीने घराकडे आला असता मुख्य दरवाजा लोटलेल्या अवस्थेत दिसला. कुलूप तोडल्याचे त्याच्या लक्षात आले. तो मागच्या दरवाजाकडे गेला असता पडवीत शेळी नसल्याचे आढळले. आतल्या बाजूने घराचा दरवाजा उघडा होता. त्याने डोकावून पाहिले असता आतील सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसले.

हा प्रकार त्याने वावी पोलीस ठाण्यात कळवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, हवालदार दशरथ मोरे, चालक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने घरापर्यंत जायला वाहनाला अडचण आली.

पोलिसांनी पाहणी केली असता शेजारच्या कांद्याच्या चाळीत मृत शेळीचे मुंडके आढळले. बंगल्यात सामानाची उचकापाचक करून ते अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसले. कपाटाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 50 हजार रुपये लांबवले. चोरट्यांनी 50 हजार घेत पडवितील शेळीचा जीव घेत ताव मारला. याप्रकरणी वावी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गलांडे यांना चोरांची सलामी

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सिंग यांनी ग्रामीण पोलीस दलात अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश दिल्यावर मनमाड येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्याकडे वावी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. गलांडे यांनी पदभार घेताच गेल्या बुधवारी वावी गावातील बसस्थानकाशेजारचे किराणा दुकान फोडून दीड लाखांची जबरी चोरी झाली. यापाठोपाठ शेळके वस्तीवरील ऐवज लांबवल्याने गलांडे यांना सलामी दिल्याची चर्चा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!