Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महामार्गांवरील ढाबे पोलिसांकडून लक्ष्य; अवैध विक्री करणारे दोघे जेरबंद, मद्यसाठा जप्त

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील महामार्गांवर लक्ष्य केंद्रित केले असून अवैधरित्या मद्य विक्री करणारे ढाबे यांची तपासणी सुरू केली आहे. बेकायदेशीर मद्यसाठा करून विक्री करणार्‍या दोघांना विशेष पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 हजारांचा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

प्रदीपसिंग रणजितसिंग गिल (रा. अशोकवन कॉलनी, नाशिक) व विनयकुमार मदन मोहनसिंग (28, रा. मिर्झापूर, उत्तरप्रदेश हल्ली. राजूर बहुला शिवार) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाची धडक मोहीम सुरू असून हॉटेल-ढाबे, महामार्गावर छुप्यारित्या मद्याची अवैध वाहतूक व विक्री करणारे, तसेच मटका व जुगाराचे अवैध धंदे चालविणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकातील अधिकारी व सेवक यांनी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजूर बहुला शिवारात सरबजीत ढाब्यावर अवैधरित्या सुरू असलेले दारू अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे.

विशेष पथकातील अधिकारी व सेवक हे वाडीवर्‍हे परिसरात महामार्गावर गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे पथकाने दुपारचे सुमारास राजूर बहुला शिवारातील सरबजीत ढाब्यावर अचानक छापा टाकला. या ठिकाणी विनयकुमार हा विनापरवाना बेकायदा विदेशी मद्याची विक्री करताना आढळून आला.

या ठिकाणी झडती घेतली असता 19 हजार 700 रुपयांचा विदेशी मद्याचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. ढाब्याचे मालक प्रदीपसिंग रणजितसिंग गिल याच्या सांगणेवरून विनयकुमार हा विदेशी मद्याची विक्री करताना मिळून आला आहे. दोघांंविरुद्ध वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायाद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक शमिर्ष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकातील सहायक पालीस निरीक्षक गोरडे व त्यांचे पथकातील सेवक यांनी ही कारवाई केली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन होणेसाठी आगामी काळातही सतत कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!