‘रोटरॅक्ट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिले वाहतूक सुरक्षेचे धडे

0

नाशिक । शहरातील रस्ते अपघात टाळण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक अंतर्गत कार्य करणार्‍या रोटरॅक्टच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षेसाठी पुढाकार घेत वाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले. आहे. शहरातील प्रमुख दहा सिग्नलवर थांबून नाशिककरांना वाहतूक शिस्तीचे धडे देण्यात आले.

रस्त्यांवरील अपघातांमुळे मृत्यू ओढवण्याच्या जगातील सर्वाधिक दुर्घटना भारतात घडतात. पैकी बहुतांश अपघात हे केवळ रस्ता सुरक्षेच्या प्राथमिक नियमांचे पालन न केल्यामुळे होतात. नाशिक शहरातील बेशिस्त वाहतूक समस्येने गंभीर वळण घेतले आहे. साधारणपणे रस्त्यावरून नियमितपणे वाहतूक करणारे 80 टक्के नागरिक स्थानिक असतात. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांमध्ये या मोहिमेविषयी जनजागृती करण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रत्येक रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास असंख्य निष्पाप लोकांनी अपघातात प्राण गमावले आहेत. शहरातील बहुतेक रस्ते चकाचक झाल्याने वाहनचालक वेगाने जातात. अनेकदा सिग्नलही पाळले जात नाहीत.

यासंदर्भात रोटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्व समजावून देण्यात आले आहे. यावर रोटरॅक्ट क्लब ऑफ गुरुगोविंद सिंग पॉलीटेक्निक कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ नासिक मेट्रो, रोटरॅक्ट क्लब ऑफ एम.जी.व्ही. फार्मसी कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ केटीएचएम कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ सपकाळ कॉलेजच्या जवळपास 150 हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला. या उपक्रमासाठी दत्त मंदिर सिग्नल, विजयममता, पिनॅकल मॉल, सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कल, त्रिमूर्ती चौक, जेहान सर्कल, जुना गंगापूर नाका, पेठ नाका, तसेच मालेगाव स्टॅन्ड अशा 10 सिग्नल्सची निवड करण्यात आली होती. या अभिनव उपक्रमाचे नाशिककरांनी स्वागत केले आहे.

या उपक्रमासाठी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. अजय देवरे तसेच वाहतूक पोलीस दलाच्या कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय रोटरॅक्ट प्रमुख लावण्य चौधरी आणि शीतल राजपूत, सामाजिक उपक्रम प्रमुख रोटरॅक्टर मुकुल सातभाई, रोटरीचे अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले, रोटरॅक्ट संचालक वैशाली चौधरी, मंथ लीडर ओमप्रकाश रावत, विजय दीक्षित आदींनी विशेष परिश्रम घेतले.

वाहतुक नियमांची जागृती
रोटरॅक्टच्या विद्यार्थ्यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान’ हा अभिनव उपक्रम यशस्वीरीत्या राबवला. गाडी चालविताना ‘मोबाइल टाळा, हॅल्मेट घाला’, सीटबेल्ट लावा, गरज नसताना गाडी बंद करा, असे वाहतुकीचे साधे-सोपे नियम त्यांनी सांगत वाहनचालकांची जनजागृती केली.

LEAVE A REPLY

*