जिल्ह्यात 27 हजार लाभार्थ्यांनी घेतला पोर्टेबल रेशनकार्डचा लाभ

0

नाशिक । आता मोबाईल कंपन्यांप्रमाणेच शिधापत्रिकाधारकांनाही ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा नाशिक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्याला शहरातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य उचलण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. आधार क्रमांकावर आधारित संगणकीय धान्यवाटप योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ 27 हजार 312 शिधापत्रिकाधाराकांनी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात सुमारे 4 हजार स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी सुमारे 90 टक्के शिधापत्रिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. आधारसंलग्न लाभार्थ्यांची ओळख पटवून पीओएस मशीनद्वारे धान्य वितरित होत आहे. त्यामुळे या योजनेद्वारे शिधापत्रिकाधारकांना शहरातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य घेता येणार आहे.

धान्य लाभार्थ्यांची माहिती आता ऑनलाईन झाल्याने आधारकार्ड नंबरच्या आधारे जुने रेशनकार्ड दाखवून नव्या किंवा बदलीच्या ठिकाणी पुरवठा अधिकार्‍यांकडून नोंदणीकृत करता येईल. त्यानंतर त्या कार्डच्या आधारे ग्राहकाला धान्य मिळवता येईल. या योजनेकडे रेशनिंग कार्ड पोर्टेबिलिटी म्हणून पाहिले जात आहे. स्वस्त धान्य वितरण योजनेअंतर्गत पायलट प्रोजेक्ट म्हणून काही राज्यांत त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती.

यात ग्राहक त्याच्या सोयीच्या दुकानातून धान्य खरेदी करू शकतो. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने केंद्र सरकारने त्या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. आता ही योजना राज्यात सर्वत्र राबवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*