स्कॉटलंड येथे रक्षाबंधन साजरी करणारी नाशिकची ‘किंजल’

0

नवीन नाशिक । भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतिक असलेला सण म्हणून रक्षाबंधन साजरा केला जातो.एकमेंकातील स्नेहभाव वृद्धींगत व्हावा हा हेतू या उत्सवामागे असल्याचे दिसून येते. केवळ भारतातच साजरा होणारा हा सण आता जागतिक पातळीवर साजरा होताना दिसून येत आहे.

उद्योग-व्यवसाय-नोकरीनिमित्त जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांनी रक्षाबंधनाचा सण जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविला आहे. रविवारी साजरा झालेला हा सण स्कॉटलॅण्डमध्येही साजरा करण्यात आला. त्यासाठी निमित्त ठरले पवननगर, नवीन नाशिक येथील केदारी कुुटुंबिय.

पवननगर येथील सूर्यनारायण चौकात राहणारे कपिल केदारी नोकरीनिमित्त स्कॉटलंड येथे पत्नी कस्तुरी व कन्या किंजलसह राहतात. या वर्षीचा रक्षाबंधनाचा सण त्यांनी एडीबरा या शहरात साजरा केला. यावेळी तेथील प्रायमरी स्कूलमध्ये शिकणार्‍या लहानग्या किंजलच्या आग्रहाखातर तेथील एडिबरा मंदिरामध्ये त्यांनी सार्वजनिक स्वरुपात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले. इथेही आगळ्यावेगळ्या पद्धतीने सैनिकांना राखी बांधण्याचा आग्रह किंजलने केला. अखेर कपिल यांच्या प्रयत्नाने रक्षाबंधनाचा सण संपन्न झाला.

किंजलच्या इच्छेप्रमाणे स्कॉटलंड आर्मी व एअर फोर्सचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित झाले. परंपरागत भारतीय पद्धतीने या सर्व स्क्वॉटिश अधिकार्‍यांचे स्वागत करून औक्षण करण्यात आले. त्यानंतर कस्तुरी केदारी व किंजल केदारी यांनी सर्व अधिकार्‍यांना राखी बांधली.

यावेळी स्कॉटलंडच्या सैन्यदल व विमानदलाच्या अधिकार्‍यांनी रक्षाबंधन उत्सवाची संकल्पना समजून घेतली. भाऊ-बहिणीच्या नात्याकडे बघण्याची भारतीय संस्कृतीची कल्पना ऐकून भारावलेल्या अधिकार्‍यांनी या कार्यक्रमामुळे आम्हाला एकच नव्हे तर शेकडो भारतीय बहिणी मिळाल्याने खूप आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. किंजलच्या बालहट्टाने भारतीय संस्कृतीच्या आगळ्या वेगळ्या पैलूची ओळख स्कॉटलंडवासियांना करुन दिली.

LEAVE A REPLY

*