कॉम्रेड राजू देसले यांना यंदाचा कॉ. दत्ता देशमुख प्रोत्साहन पुरस्कार

0

नाशिक : कॉम्रेड राजू देसले यांना यंदाचा कॉ. दत्ता देशमुख प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला असून येत्या १७ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग येथे प्रदान करण्यात येणार आहे.

कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या प्रेरणेने व विचाराने प्रेरित होऊन कॉम्रेड दत्ता देशमुख विचार मंचाच्या माध्यमातून पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांची एकजूट बांधून त्यांची एकसंध फळी निर्माण व्हावी यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कामगारांची शैक्षणिक शिबिरेही घेतली जातात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी पुरोगामी विचारांच्या जनचळवळीत सक्रीय असलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येतो. त्याचप्रमाणे कार्यरत असलेल्या एका कार्यकर्त्या पुढाऱ्यास प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

नाशिक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तरूण कार्यकर्ते कॉम्रेड राजू देसले, ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (ए.आय.एस.एफ) सोबत १९९१ पासून विद्यार्थी चळवळीत सक्रीय होत त्यानंतर सातत्याने युवक,  शेतकरी, शेतमजूर, मोलकरीण, असंघटीत आशा कामगार, मोलकरीण, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार व अन्य कंत्राटी कामगारांसाठी कार्यकर्त आहेत. त्यांनी शेतकरी सुकाणू समितीच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे, समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे ते राज्य समन्वयक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात तरुण राज्यसचिव मंडळ सदस्य, आयटक या केंद्रीय कामगार संघटनेचे राज्यसचिव, तथा किसान सभेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

यासर्व चळवळीत सक्रीय असताना विद्यार्थी प्रश्नासाठी ८ दिवस नाशिक येथील सेन्ट्रल जेलमध्ये तुरुंगवास, शेतकरी आंदोलनामुळे पोलिसांकडून ६ महिने आंदोलन बंदी, त्यानंतर मोबाईल जप्ती अश्या अवाहनांना सामोरे जात आहेत. कंत्राटी कर्मचारी, मानधन वरील कर्मचारी चळवळीत सक्रिय नेतृव करत आहेत, आदी चळवळीतील सक्रीय भागीदारीबद्दल त्यांना प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

विचार मंचाच्या विश्वस्त मंडळाची बैठक पुणे येथे झाली. त्यास कॉ.मा.वि.जोगळेकर (अध्यक्ष, अंबरनाथ), डॉ.बाबा आढाव (पुणे), कॉ.मोहन देशमुख (संगमनेर), कॉ.कृष्णा भोयर (पनवेल), कॉ.व्ही.डी.धनवटे (नाशिक), एम.के.चवरे (जुन्नर), कॉ.बी.एम.कुलकर्णी (पंढरपूर), कॉ.जे.एन.पाटील (कोल्हापूर), कॉ.प्रदीप नेरुरुकर (कुडाळ) आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुरस्कारांर्थींची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

*