Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार; रस्ते गेले पाण्याखाली

Share

नाशिक : नाशिक शहर तसेच जिल्ह्याला आज मध्यरात्रीपासून पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर तसेच इतर तालुक्यात बऱ्याच प्रमाणात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता.

दरम्यान आज मध्यरात्रीपासून दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नरसह नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बऱ्याच ठिकाणी द्राक्षबागेच्या शेतामध्ये पाण्याचे तळे झालेले दिसत आहे. आज मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मका लागवड, कपाशी, बाजरी, मूग पेरण्यांना आता सुरवात होईल. आज सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती तर काही ठिकाणी पावसाच्या आगमनाची प्रतीक्षाच होती. आज संपूर्ण जिल्ह्यातच पावसाचे आगमन झाल्याने दिलासा मिळाला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे गल्लीमधील रस्त्यावरून गुडघेभर पाणी वाहत असल्याने येथील जनसामान्यांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे. तसेच सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसंपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाणगाव परिसराची जीवनवाहिनी असणारी म्हाळुंगी नदी प्रवाहित झाली आहे. यंदाच्या पावसाळयात नदीला पहिला पूर आला असून ठाणगाव, पाडळी परिसरातील शेतकरी आनंदात आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पूर्व भागासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात देखील पाणी साठा वाढायला मदत होणार आहे.

पिंपळगाव फाटा ते पिंपळगाव खांब याना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पावसामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. सततच्या पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केले आहे.

नाशिक -त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथील पुलानजीक रस्त्यावर पूरपरिस्थिती निर्माण झाली. यावेळी वाहनधारकांना कसरत करावी लागली असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

नाशिक येथील गोदावरी नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. आज सुरू असलेल्या संततधार पावसाने छोट्या नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे तर नदीपात्र दुथडी भरून वाहताना पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!