Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी ते कसारा दरम्यान प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या कसारा घाटातील लांबलचक रेल्वेचे बोगदे, चढ उतार, नागमोडी वळणे व थेट दोन डोंगरांना जोडणारे रेल्वे पुल यामुळे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे महत्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. इगतपुरीहुन कसाराकडे जातांना तीव्र उतार असल्याने घाटात तीन ठीकाणी सर्वचं मेल, एक्सप्रेस थांबवुन ब्रेक चेक केली जातात.

इगतपुरी ते कसारा या मार्गे मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. कसारा घाटात काही विपरीत प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाच्या पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाकडुन २४ तास पेट्रोलिंग करून दक्षता घेण्यात येते. इगतपुरी सोडल्यानंतर घाट उतार लागतो. यासाठी ब्रेकचेकिंग केले जातात. या करीता घाटात रेल्वेचे अधिकृत कर्मचारी असतात त्यात बाहेरील व्यक्तीला आसपास फिरकुही दिले जात नाही इतकी कडेकोट सुरक्षा ठेवली जाते.

कसारा ते इगतपुरी पर्यंत उंच घाट असल्याने कसारा रेल्वे स्थानकात मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या सर्व मेल व एक्सप्रेसच्या मागे तीन रेल्वे इंजन लावले जातात. इगतपुरी रेल्वे स्थानकात गाडी आल्यानंतर मागे जोडलेली हे इंजन काढुन पुन्हा कसाराकडे रवाना करण्यात येते. कसाऱ्याहुन मुंबईला जाण्यासाठी लोकल असुन ही लोकल पकडण्यासाठी याच इंजिनला आजु बाजुला लटकुन अनेक प्रवासी कसाराकडे जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

रेल्वे सुरक्षा बल (आर.पी.एफ) मार्फत बाहेरील व्यक्ती जर रेल्वे लाईन ओलांडत असतील तर त्यांच्यावर रेल्वे कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. एवढे असताना इगतपुरीतून रेल्वेशी कुठलाही संबंध नसताना बाहेरील व्यक्ती रेल्वे इंजिनमागे लटकून जीव धोक्यात घालून तसेच इंजिन ड्राइवरच्या सहमतीने बेकायदेशीर इगतपुरी ते कसारा विना तिकीट प्रवास कसा काय करतात हे एक कोडेच आहे.

दरम्यान जर एवढी कडक सुरक्षा असताना, हे प्रवाशी दररोज असा प्रवास करत असतील तर रेल्वे सुरक्षा बल (आर.पी.एफ) व लोको पायलट यांच्याशी काही लागे बांधे तर नाही ना अशी येथील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. जर अशा बेकायदेशीर प्रवाशांमुळे काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल असेही बोलले जात आहे.

बेकायदेशीरपणे प्रवास करणारे पुरुष व स्त्रीया यांच्याकडे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान मुद्दाम कानाडोळा करत असल्याचे समोर येत असून, यावर त्वरीत कारवाई करुन ही बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!