Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘रॅगिंग’बाबत ‘युजीसी’ कठोर

Share

नाशिक । प्रतिनिधी
रॅगिंगच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘रॅगिंग’संदर्भात विद्यापीठांना कडक निर्देश दिले आहेत. त्यानुसार विद्यापिठे व महाविद्यालयांंना या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.

न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत आयोगाने विद्यापिठांच्या कुलगुरूंना पत्र पाठवून रॅगिंग विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयोगाचे सचिव रजनिश जैन यांनी केल्या आहेत. महाविद्यालयांच्या शैक्षणिक विभाग, परिसर आणि वसतिगृहांमध्ये रॅगिंग होऊ नये याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आयोगाकडून करण्यात आल्या आहेत.

‘रॅगिंग फ्री कॅम्पस’ करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. विविध उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांमध्ये विविध पद्धतीने रॅगिंग सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन अभ्यास, त्यांच्या भविष्याला खीळ बसू शकते. रॅगिंगसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध लागावा याकरिता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापिठांच्या कुलगुरूंना पत्र पाठविले आहे.

शैक्षणिक परिसरात रॅगिंगच्या घटना होत असतील तर विद्यार्थ्यांनी कुणालाही न घाबरता तक्रार करावी, विद्यार्थी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यापीठातील विभाग प्रमुख, विद्यार्थी कल्याणचे संचालक किंवा युजीसीकडे याबद्दल तक्रार करू शकतात. विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी कायद्याची ओळख व्हावी याकरिता माहिती देणारे पोस्टर्सदेखील तयार करण्यात यावे अशी सूचना आयोगाने केली आहे.

दोषींना होणार्‍या शिक्षा

 • मेस आणि वसतिगृहात प्रवेशाला बंदी
 • शिष्यवृत्ती थांबविणे
 • महाविद्यालयातून हकालपट्टी
 • परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारणे
 • इतर संस्थात प्रवेशास बंदी
 • फौजदारी कारवाई

आयोगाने विद्यापीठाला केलेल्या सूचना

 • शैक्षणिक विभाग, महाविद्यालय आणि वसतिगृहात रॅगिंग विरोधी दक्षता पथक स्थापन करणे.
 • शैक्षणिक परिसराच्या प्रथमदर्शनी भागात सूचनाफलक लावणे.
 • महाविद्यालय व वसतिगृहात प्रवेशाच्या वेळी रॅगिंग करणार नाही या आशयाचे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे.
 • शैक्षणिक परिसरात रॅगिंगविरोधी जागृतीचे आयोजन करणे.
 • विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी याकरिता निबंध व भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करणे.
 • रॅगिंग विरोधी अधिनियमाची पायमल्ली करताना आढळून आलेल्या विद्यार्थ्यावर कडक कारवाई करणे.

पालन होणार का?
विद्यापीठ अनुदान आयोगाने जरी ‘रॅगिंग’संदर्भात कठोर कायदा केला असला तरी त्याचे विद्यापिठांतर्गत कार्यरत महाविद्यालयांकडून खरोखरच किती प्रमाणात पालन होणार हा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये ‘रॅगिंग’चे नियम केवळ कागदावरच दिसून येतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!