Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

Share

नाशिक । जिल्ह्यात रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाकरिता बियाणांची मागणी केली आहे. जिल्ह्याकरिता 1 लाख 6 हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून महाबीज, राबिनी व खासगी कंपन्यांकडून आतापर्यंत 22 हजार 200 क्विंटल बियाणांचा जिल्ह्यात पुरवठा झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल व भुईमूग या रब्बी हंगामातील पिकांकरिता 1 लाख 6 हजार 292 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवलेली आहे. त्यानुसार आतापर्यंत महाबीज कंपनीचे 5 हजार 332 क्विंटल, राबिनीचे 920 क्विंटल तर खासगी कंपन्यांचे 15 हजार 948 क्विंटल असे एकूण 22 हजार 202 क्विंटलचा पुरवठा जिल्ह्यात झालेला आहे. यामध्ये ज्वारी 119 क्विंटल, गहू 18 हजार 138 क्विंटल, मका 318 क्विंटल, हरभरा 3625 क्विंटल याप्रमाणे बियाणांचा पुरवठा झालेला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली.

अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेल्या क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्याच्या आशेवर असलेल्या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. जमिनीला पेरणी योग्य वाफसा नसल्याने जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला काहीसा उशीर होत आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

तर अतिवृष्टीमुळे महापुराच्या तडाख्यातून सुटलेला पिकांना फटका बसला. खरीप हंगाम हातचा गेलेला असताना उरली-सुरली काढणी योग्य झालेल्या पिकांना परतीच्या पावसाने तडाखा दिला. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची कापणी लांबत गेली. महापूर आणि अतिवृष्टीने खरीप हंगामातील भरपाई रब्बी हंगामात करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे.

रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, मका आदी तृणधान्यासाठी 70 हजार 764 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. हरभरा, उडीद, मूग अशा कडधान्यांचे 41,184 हेक्टर क्षेत्र निश्चित केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!