Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘निरी झर’वॉटर फिल्टरच्या माध्यमातून पुराचे घाण पाणीही पिण्यायोग्य

Share

नाशिक । शहराबाहेरील छोटी खेडी व वस्त्या अशा ठिकाणी नेहमी अशुद्ध पाण्याची समस्या असते. मात्र आता या पाण्यासह पुराचे घाण पाणी पिण्यायोग्य करण्याचे नवे संशोधन निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेने केले आहे.

जेथे पूर परिस्थिती उद्भवते किंवा भूजलातूनही गढूळ पाणी येते तेथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. अशा ठिकाणी सहज शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी निरीने ‘निरी झर’ वॉटर फिल्टर विकसित केले आहे. त्याचा लाभ पूरग्रस्त भागातील हजारो नागरिकांना होत आहे. एखाद्या ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवल्यास चोहीकडे पाणीच पाणी असते. पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी निरीने अगदी सोप्या पद्धतीचे वॉटर फिल्टर विकसित केले आहे. विशेष म्हणजे, याचे स्वामित्व हक्कदेखील मिळवले आहे.

निरीच्या संशोधकांच्या चमूने सुरुवातीला दोन तीन प्रकारचे वॉटर फिल्टर विकसित केले. यामधून निरी झर सर्वात यशस्वी ठरले. हे फिल्टर एकावेळी पूर्ण कुटुंबाला पुरेल इतके अर्थात 22 लिटर पाणी शुद्ध करते. स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. हे वॉटर फिल्टर स्टील भांड़्याच्या दोन भागात तयार करण्यात आले असून वरील भागाला तळाशी दोन छिद्र तयार करण्यात आले आहे.

त्यावर एका बारीक जाळीच्या पिशवीमध्ये पाच सेंटिमीटरपर्यंत वाळू टाकण्यात आली आहे. खालच्या भागात वरील टाकण्यात आलेले गढूळ पाणी शुद्ध होऊन गोळा होते. त्याला समोरील भागात तोटीदेखील लावण्यात आली आहे. वरील भागात अशुद्ध पाणी टाकताच त्यामध्ये दोन चार थेंब क्लोरिन टाकले की 20 मिनिटात गढूळ पाणी पिण्यायोग्य होते.

पूरपरिस्थितीत निरीतर्फे अडीच हजार निरी झर वॉटर फिल्टर मोफत वाटण्यात आले. कर्नाटक, बेळगांव येथे निरीच्या चमूने जाऊन नागरिकांच्या याबद्दलचे फायदे आणि कशाप्रकारे निरी झर वापरायचे, याची माहिती दिली. त्याशिवाय दर सहा-आठ महिन्यांत चमू जाऊन त्याची पाहणीदेखील करते. कोल्हापूरला आलेल्या महापुराच्या वेळीही निरी झरचे वाटप करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!