व्यक्तिमनाचा अंतरंग जाणणारे मानसशास्रज्ञ नंदकुमार कुलथे यांचं निधन

0

नाशिक : प्रसिद्ध मानसशास्रज्ञ तसेच प्राध्यापक नंदकुमार कुलथे यांचं काल २७ रोजी निधन झाले. आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. प्रा. कुलथे यांनी मानसशास्त्राच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य हाती घेतले होते. आणि ते अव्याहतपणे चालू होते.

शहादा येथील अण्णा पाटील यांच्या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापकी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मानसशास्त्राचे धडे देण्यास सुरुवात केली. सुमारे २५ वर्षे प्राध्यापकी केल्यावर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती पत्करली. हे करताना त्यांनी मानसशास्त्रावर आधारित अनेक पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचे पुरस्कारदेखील मिळाले आहेत. ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाचे निवृत्त प्रमुख डॉ. सी. जी. देशपांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ प्राध्यापकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

प्रारंभी वृत्तपत्रांत पत्रे, छोटे लेख असे लेखन करणार्‍या कुलथे यांनी ‘अमृत’ मासिकात परिश्रमपूर्वक अभ्यास, पाहण्या करून मौलिक लेखन केले. वडिलांचा आदर्श वेगळ्या पद्धतीने जोपासताना, नंदकुमार कुलथे यांनी शक्य तेवढ्या आधुनिक कल्पना आचरणात आणायचा प्रयत्न केला. नाशिक, शहादा, पुणे या कार्यक्षेत्रात त्यांनी काम केले. नुकतेच पुण्यात त्यांच्या ’मानसरंग’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन डॉ. सी. जी. देशपांडे यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाच्या प्रथम आणि द्वितीय आवृत्तीस अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराचा समावेश आहे.

’बातचीत मनोविकार तज्ज्ञांशी’ हे कुलथे यांचे वाचकांच्या पसंतीस उतरलेले एक पुस्तक, तर ’अंतरंग युवा मनाचे’ हे खास युवकांची मनोवस्था जाणून घेणारे पुस्तकदेखील चांगलेच लोकप्रिय झाले. या बरोबरच कथा, कविता असे लेखनदेखील त्यांनी केले.

LEAVE A REPLY

*