Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : शहरातील अनेक क्लासेस धोकादायक

Share

नाशिक । प्रतिनिधी
जुन्या इमारती, अरूंद जिने, बेसमेंटमध्ये क्लास, अग्निशमन उपाययोजनांचे तीन तेरा अशा अवस्था असल्याने शहरासह जिल्ह्यातील अनेक खासगी कोचिंग क्लासेसच्या इमारती आपत्ती सुरक्षेबाबत कुचकामी असल्याचे चित्र आहे.

गुजरातमधील सुरत येथे तक्षशिला कॉम्प्लेक्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लासेस सुरू असताना तेथे अचानक आग लागली. या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला. त्यामुळे 22 विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. सुरतमधील या घटनेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील क्लासेसमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अग्निशमन यंत्रणाही यामुळे खडबडून जागी झाली आहे. क्लासेसच्या संघटनेला याबाबत पत्र पाठवण्यात आले असून त्याची प्रत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, सर्व तहसीलदार आणि मुख्याधिकार्‍यांना पाठवण्यात आली आहे.

शहरातील अशोकस्तंभ, गोळे कॉलनी, कॉलेजरोड, मालेगाव स्टॅण्ड, गंगापूररोड, टिळक चौक या महत्त्वाच्या ठिकाणी खासगी क्लासेसची संख्या मोठी आहे. यासह उपनगरीय भागात, ग्रामीण भागात असलेली विद्यालये, महाविद्यालयांच्या परिसरात खासगी क्लासेसचे पेव फुटले आहे. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेणार्‍या क्लासेसकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मात्र दुर्लक्ष केले जाते. शहरातील अनेक भागातील जुन्या इमारतींमध्ये क्लासेस असून तेथील जिने अरूंद आहेत.

एकाच खोलीत फर्निचर अथवा पडद्यांचा वापर करून विभागणी करण्यात आली आहे. बहुतांश क्लासेसच्या ठिकाणी अग्नीविरोधी सुरक्षा यंत्रणाच उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी इमारतींच्या बसेमेंटमध्ये क्लास आहेत. अनेक क्लासेसमध्ये विद्यार्थी संख्येचे कोणतेही बंधन पाळले जात नाही.

खासगी क्लाससाठी नोंदणी करतानाच पार्किंग, स्वच्छतागृहांची आवश्यकता, विद्यार्थी संख्येवर नियंत्रण, शिक्षकांसाठी विशिष्ट पात्रता, नोटस् आणि पुस्तके मोफत देण्याची अट, शुल्क निश्चिती, अग्निसुरक्षेबाबत विशेष काळजी घेणे, एका वर्गात विद्यार्थी संख्या जास्तीत जास्त 80 असणे तसेच दर तीन वर्षांनी मूल्यांकन करणे आदी अटींचे पालन होणे आवश्यक असल्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.

तर क्लासेसवर कडक कारवाई
खासगी क्लासेसचालकांकडे फायर सेफ्टी, फायर एस्टिंग्युशर, फायर बॉलसारखी यंत्रणा असायला हवी. अग्निसुरक्षा यंत्रणेचा परवाना हवा, क्लासेसमध्ये प्लायवूड किंवा पत्रा वापरून पार्टिशन नसावे, विद्यार्थी संख्या मर्यादित असायला हवी. विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असायला हवेत. आपत्ती व्यवस्थापनाबाबत विद्यार्थी आणि शिक्षक यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर आपत्तीची रंगीत तालीमही व्हायला हवी. अशा प्रकारची व्यवस्था नसलेल्या व कार्यवाही न करणार्‍या क्लासेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– प्रशांत वाघमारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

शहरातील अंदाजित क्लासेस

2000 ते 2500

संघटनेचे सभासद

700 ते 750

शहरातील एकूण विद्यार्थी

5 ते 6 लाख

क्लासेसमध्ये जाणारे विद्यार्थी

4 ते साडेपाच लाख

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!