Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पोस्ट पेमेंट बँक ठरतेय निराधारांचा ‘आधार’

Share

नाशिक । अजित देसाई

कोणत्याही बँकेचा आधारसंलग्न खातेदार असणार्‍या व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत देशाच्या कोणत्याही भागातील पोस्ट कार्यालयात किंवा टपाल वाटप करणार्‍या पोस्टमनच्या माध्यमातून १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची सुविधा पोस्ट पेमेंट बँकेने १ सप्टेंबरपासून उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेचा लाभ वृद्ध, दिव्यांग व्यक्तींसह दुर्गम भागातील व बँकिंग सुविधेचा अभाव असणार्‍या भागातील जनतेला सुलभतेने होणार आहे. केवळ आधार क्रमांकाची पडताळणी करून खात्यावरून पैसे काढता येत असल्याने पोस्ट पेमेंट बँक निराधारांसाठी खर्‍या अर्थाने आधार ठरली आहे. वर्षपूर्तीनिमित्त इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आधारसंलग्न भुगतान सेवा अर्थात एईपीएस या योजनेची १ सप्टेंबरपासून देशातल्या सर्व पोस्ट कार्यालयांमार्फत अंमलबजावणी सुरू केली आहे.

पोस्ट बँकेचे खातेदार नसणार्‍यांना देखील आधारसंलग्न असणार्‍या त्यांच्या इतर बँकांच्या खात्यावरून पैसे काढण्याची सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे. १० हजार रुपयांपर्यंतची खात्यावरील रक्कम काढतेवेळी किमान तेवढी रक्कम खात्यावर हवी ही अट यासाठी घालण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ प्रामुख्याने ज्या भागात एटीएम सुविधा नाही, बँकेची शाखा गैरसोयीच्या अंतरावर आहे अशा ठिकाणी फायदेशीर ठरणार असल्याचे पोस्ट बँकेच्या वतीने सांगण्यात आले होते. वृद्ध व निराधारांसाठी खर्‍या अर्थाने आधार ठरणारी ही सेवा आहे. या सेवेबद्दल नाशिकचा विचार करायचा झाल्यास डाक विभागातील २९३ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असून पोस्ट मास्तर आणि पोस्टमन यांच्या मदतीने या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवणसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम असणार्‍या भागात या सेवेचा उद्देश यशस्वी झाल्याचे चित्र आहे. विभागाचे प्रवर डाक अधीक्षक आर. डी. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली व बँकेचे नाशिक शाखेचे वरिष्ठ प्रबंधक राजेंद्र आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भागात आधारसंलग्न भुगतान (एईपीएस) सेवा प्राधान्याने राबवण्यात येत आहे. आज हरसूलच्या ठाणापाडासारख्या खेड्यातील आदिवासी वृद्ध सरकारच्या निवृत्तीवेतनाचा लाभ बँकेची पायरी न चढता गावातील पोस्टमनकडून घेत आहेत. हा बदल सकारात्मक असून दुर्गम भागातल्या झोपडीत राहणार्‍या व्यक्तीलादेखील आर्थिक सक्षमता देणारा ठरला आहे.

सिन्नरला पथदर्शी प्रकल्प
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींना अनुदान वितरित करण्यात येते. यात निराधार योजना, वृद्धापकाळ योजना, विधवांसाठी अर्थसहाय्य आदी योजनांचा समावेश आहे. या योजनांमधील लाभार्थींना महाडीबीटी पोर्टलवरून आगामी काळात थेट बँक खात्यावर अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील पथदर्शी प्रकल्प सिन्नरमध्ये राबवण्यात येणार आहे. यासाठी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींची बँक खाती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडण्याची मोहीम लवकरच हाती घेतली जाणार आहे.

पोस्ट बँकिंगमध्ये नाशिक अव्वल
वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून नाशिक व मालेगाव विभागात असणार्‍या सुमारे ६५० पोस्ट कार्यालयांमध्ये सुमारे ६० हजार झिरो बॅलन्स बचत खाती उघडण्यात आली आहेत. त्याद्वारे खातेदारांना ऑनलाईन बँकिंग सुविधांसह पोस्टाच्या ऑफलाईन असणार्‍या आर्थिक सुविधांचा एकत्रित लाभ देण्यात येत आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेले पोस्ट बँकेचे कामकाज देशात अव्वल ठरले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!