Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोस्ट बँकेतून मिळणार शासकीय योजनांचे अनुदान

Share

नाशिक । प्रतिनिधी
पोस्ट पेमेंट बँकेची पाळेमुळे घट्ट रोवली जात असून आजमितीला जिल्ह्यात बँकेच्या 600 शाखा कार्यन्वित आहेत. ग्रामीण भागात बँकिग सुविधेचा अभाव लक्षात घेता यापुढे शासकीय योजनांचे अनुदान हे पोस्ट बँकेतून दिले जाणार आहे. त्याबाबत बँकेने जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पोस्ट बँकेतून डीबीटी योजनेचा लाभ घेता येईल.

टपाल खात्याचे नाशिक व मालेगाव असे दोन विभाग आहे. त्यात नाशिक विभागात 280 तर, मालेगाव विभागात बँकेच्या 320 शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या ग्राहकांची संख्या ही 20 हजार इतकी असून एक कोटी 25 लाख इतके बँकेचे भांडवल आहे. ग्रामीण भागात बँकिंग सुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा आहे.

त्यामुळे ग्रामस्थांना बँकिंगसाठी तालुक्याचे मुख्यालय गाठावे लागते. ही अडचण लक्षात घेता ग्रामीण भागात बँकिंग सुविधांचे जाळे विस्तारण्याच्या उद्देशाने पोस्ट पेमेंट बँकेची दोन वर्षांपूर्वी सुुरुवात करण्यात आली होती. बँकेतून सुकन्या समृद्धी, पीपीएफ, आरडी या सुविधांचा लाभ ग्राहकांना घेता येत आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे तेथील ग्रामस्थांना बँकिंग व्यवहारासाठी तालुक्यात जाण्याची वेळ येत नाही. तसेच, पोस्ट पेमेंट बँकेतून यापुढे इतर शासकीय योजनांचे अनुदान देण्याचा मानस आहे.

शौचालय अनुदान, रोजगार हमी योजना, घरकुल योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनांचे अनुदान बँकेतून देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे. याबाबत जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करण्यात आला असून ग्रीन सिग्नल मिळाल्यास ग्रामीण भागातील जनतेला मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

ग्राम डाक सेवकाद्वारे खोला खाते
ग्रामीण भागातील जनतेला ग्राम डाक सेवकाद्वारे खाते खोलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डाक सेवकाकडे मोबाईल आणि बायोमेट्रीक यंत्र देण्यात आले आहे. खाते खोलण्यासाठी डाक सेवक घरी आल्यावर त्यास आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर द्यायचा. तो मोबाईलद्वारे ही माहिती फिड करेल व बायोमेट्रीक यंत्रावर थम्पस् घेईल व खाते काही क्षणात उघडले जाईल. गावातील पोस्ट बँकेच्या शाखेत जाऊन लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान तत्काळ मिळेल.

पोस्ट पेमेंट बँकेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. ऑनलाईन बँकेमुळे ग्राहकांना घरबसल्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. शासकीय योजनांचे अनुदान पोस्ट बँकेतून केले जावे, यासाठी जिल्हा परिषदेला प्रस्ताव दिला आहे.
– राजेंद्र आघाव, वरिष्ठ प्रबंधक, नाशिक शाखा

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!